खेड, हवेली, दौंड तालुक्यातील 65 गावांमधील निर्बंध शिथिल होणार
पुणे – भीमा नदीच्या भामा या उपनदीवरील भामा-आसखेड पाटबंधारे प्रकल्पाचा उजवा व डावा हे दोन्ही कालवे रद्द करण्याचा निर्णय शासनाने जारी केला आहे. या निर्णयामुळे खेड, हवेली आणि दौंड तालुक्यातील 65 गावांमधील लोकांच्या शेतजमिनीवरील निर्बंध शिथिल होऊन शिक्के उठवण्यात येणार असून याचा लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे.
या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील ज्या प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीनीचे वाटप करण्यात आले आहे. अशांना नजीकच्या ठिकाणी सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात देण्यात येणार आहे. भामा उपनदीवर करंजविहीरे येथे माती धरण बांधण्यात आले आहे. भामा-आसखेड धरणाचे पूर्ण झाले असून, 2010 पासून या धरणात पाणी साठा करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा पाणी वापर 6.67 टीएमसी इतका आहे.
भामा आसखेड प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी हस्तांतरण बंदीचे लावण्यात आलेले शेरे महसुल व वन विभागाच्या शासन आदेशानुसार उठविण्याची कार्यवाही करावी. भामा आसखेड प्रकल्पातील जे प्रकल्पग्रस्त खासबाब अनुदान मागणी करतील त्यांना अनुदान उपलब्ध करून देण्याचे उत्तरदायित्व पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे राहिल तसेच या दोन्ही पालिका यांनी मंजूर पाण्याच्या कोट्याच्या हिश्याप्रमाणे येणारी रक्कम पुनर्वसन खर्चापोटी अदा करावी, असे आदेश शासनाने दिले आहे. याबाबतचा शासन निर्णय जलसंपदा विभागाचे उपसचिव प्रसाद नार्वेकर यांनी जारी केला आहे.
किफायतशीर नसल्याने निर्णय
भामा आसखेडच्या मुळ प्रकल्पाच्या मंजुरीच्यावेळी सिंचनास प्रथम प्राधान्य देण्यात आले होते. मात्र गेल्या पंचवीस वर्षात पुण्याच्या लोकसंख्येत वाढ झाल्याने, या प्रकल्पाचे एकूण 147.636 दलघमी. सिंचनाचे पाणी बिगर सिंचनाकडे वळविण्यात आले असून पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात आले. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच चाकण लगतच्या 19 गावांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या 23 हजार 110 हेक्टर लाभ क्षेत्रापैकी 19 हजार 645 हेक्टर लाभ क्षेत्र लाभधारकांच्या मागण्यांनुसार वगळण्यात आले आहे. त्यामुळे डाव्या आणि उजव्या कालव्यांची कामे करणे किफायतशीर ठरणार नसल्याने हे दोन्ही कालवे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
असे आहे पाणी वाटप
* एकूण पाणीसाठा 6.67 टीएमसी
* बिगर सिंचनासाठी मंजूर पाणीसाठा – 5.21 टीएमसी
* पुणे महानगरपालिकेसाठी मंजूर पाणीसाठा – 2.67 टीएमसी
* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी मंजूर पाणीसाठा -2.14 टीएमसी
* चाकण व लगतच्या 19 गावांसाठी मंजूर पाणीसाठा- 0.14 टीएमसी
* औद्योगिक वापरासाठी – 0.02 टीएमसी