पुणे जिल्हा : भाजपचा विद्युत महावितरणला झटका

आंदोलना अगोदरच फीडर केले चालू ः प्रदीप कंद, संदीप भोंडवे यांच्या कार्याने शेतकरी आनंदित

कोरेगाव भीमा – शेतकरी बांधवांच्या नदीकाठावरील फिडर बंद केल्यावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद व भाजपचे नवनिर्वाचित हवेली तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली पेरणे महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आंदोलन सुरु होण्याआधीच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

शनिवारी (दि. 18) विद्युत महावितरण पेरणे विभाग यांनी शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता न्हावी सांडस, पिंपरी सांडस, सांगवी सांडस, तुळापूर, लोणीकंद व इतर काही गावातील फीडर बंद केले होते. त्यामुळे अचानकच पूर्व हवेलीमधील या गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला होता.

करोनाचे संकट, लहरी पाऊस व शेत बाजारभावाबद्दल अनिश्‍चितता यामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेला पूर्व हवेलीमधील शेतकरीवर्ग अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने उद्विग्न झाला होता.

शेतकऱ्यांचे पीक ऐन जोमात आले असताना भीमा नदीकाठावरील पूर्व भागातील फिडर अचानक बंद करण्यात आले. या संदर्भात अधिकृत पत्रही पेरणे महावितरण चे शाखा अभियंता अंकुश मोरे यांना देण्यात आले होते. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता व्ही. एन. जाधव यांनी आंदोलनाची दखल घेतली व शेतकरी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रदिप कंद व संदीप भोंडवे यांच्यासमवेत चर्चा करत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला.

शेतकरी बांधवांना अजून 8 दिवस चालू बिले भरण्यासाठी आम्ही वेळ देऊ असे आश्‍वासन जाधव यांनी देण्याबरोबरच ताबडतोब फीडर चालू करण्याचे आदेश दिले. यावेळी चर्चेद्वारे शेतकरी बांधवांच्या कष्टातून उभ्या असलेल्या पिकाबरोबरच अधिक अडचणी वाढू नये म्हणून वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात आला.

संदीप भोंडवे हे स्वतः पिंपरी सांडस येथील बनकर वस्ती वरील फीडरवर सहायक अभियंता अकुंश मोरे यांच्या समेवत गेले. तेथे विद्युत पुरवठा सुरळीत केला. त्यानंतर लगेचच इतर गावातील फीडरवरील विद्युत पुरवठा सुरु करण्यात आला. यावेळी न्हावी सांडस, पिंपरी सांडस व सांगवी सांडस या हवेली तालुक्‍यातील पूर्व भागातील गावांचे तसेच प्रामुख्याने भीमा नदीकाठावरील शेतकरी बांधवांचे पिकाचे नुकसान होण्यापासून टळले असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

सर्व शेतकरी बांधवांनी पुढील 8 दिवसांमध्ये चालू बिले भरून विद्युत महावितरणला सहकार्य करावे.
– संदीप भोंडवे, हवेली तालुकाध्यक्ष, भाजप

ज्या शेतकरी बांधवानी लाईट बिले भरलेली आहेत, त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करुन शेतकरी बांधवावर अन्याय करू नये.
– प्रदीप कंद, , माजी अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद

सकारात्मक चर्चा झाली.
विद्युत महावितरणचे समिती सदस्य विपुल शितोळे यांनी विद्युत महावितरण व आंदोलनकर्ते यांच्यात सन्मवय साधण्यासाठी मध्यस्थीची भूमिका पार पाडली. सकारात्मक चर्चा घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.