तालुकाध्यक्ष तेजस देवकाते यांनी महसूल मंत्री यांच्याकडे केली तक्रार इंदापूर – इंदापूरच्या महसूल विभागातील तहसीलदार व कार्यालयातील अधिकार्यांची चौकशी करा व तात्काळ कारवाई करा, अशी लेखी तक्रार भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुका अध्यक्ष तेजस देवकाते पाटील यांनी थेट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केलेल्या तक्रारीमध्ये, तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कामाची पद्धत फारच संथ गतीने आहे. तहसीलदार हे सर्वसामान्य जनतेला फार वेळ कमी देतात. एखाद्या कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात. कोणत्याही सर्वसामान्यांचे फोन उचलले जात नाहीत. त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील स्थानिक सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे हितसंबंध जोपासून तहसीलदार बनसोडे काम करत आहेत. असे गंभीर आरोप करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम हे तालुका दंडाधिकारी यांचे असताना देखील, त्यांच्याकडून नेहमीच याउलट काम तालुक्यात होताना दिसत आहे. याचे उदाहरण म्हणजे काय? काही दिवसांपूर्वी सकल हिंदू समाजाच्या छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या संदर्भात, एक रस्ता रोको आंदोलन इंदापूर या ठिकाणी करण्यात आले होते. या आंदोलनाला प्रमुख म्हणून आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. यावेळी तहसीलदार यांनी कोणत्याही प्रकारे समजूतदारपणाची भूमिका न घेता, आडमूठ भूमिका घेतली. त्यामुळे अधिक वेळ हे आंदोलन चिघळले. यासारखे अनेक प्रकार वारंवार इंदापूर तालुक्यामध्ये घडत आहेत. या घटनेची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तालुक्यात चिडीचे वातावरण महसूल मंत्री बावनकुळे यांच्या निदर्शनास, इंदापूर तहसीलदारांच्या अनेक गोष्टी या निवेदनाद्वारे आणून देण्यात आले आहेत. तहसीलदार यांच्या कार्यपद्धतीवर अनेक नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर संबंधित तहसील ऑफिस मधील कर्मचारी सर्वसामान्य माणसांना पूर्ण वेळ न देता, आपल्या मनमानी कारभाराप्रमाणे कारभार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण करत आहेत. अनेक रस्त्याचे प्रकरण निकाला अभावी अडकून पडले असल्याचे त्यामुळे चिडीचे वातावरण निर्माण झाले आहे. असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.