पुणे जिल्हा : भीमाशंकरचा कारभार उत्तम; विनाकारण बदनामी करू नये

बाळासाहेब बेंडे पाटील : पारगाव येथे पत्रकार परिषदेत आवाहन
मंचर/पारगाव – पारगाव (ता. आंबेगाव) दत्तात्रयनगर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हीत जोपासण्याचे काम केले असून, कारखान्याचे संस्थापक आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भीमाशंकर साखर कारखान्याच्या कारभार उत्तम पद्धतीने चालू आहे, कोणीही भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची बदनामी करू नये व शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी केले.
पारगाव दत्तात्रय नगर येथे भीमाशंकर कारखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संचालक बाबासाहेब खालकर, थिटे, रामचंद्र ढोबळे, आनंदराव शिंदे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, माजी संचालक विलास लबडे आदी उपस्थित होते. बेंडे म्हणाले, भीमाशंकर साखर कारखान्याने केंद्र शासनाच्या वतीने ठरवून दिलेल्या एफआरपीची रक्कम 2 हजार 750 रुपये या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत.
देवदत्त निकम हे कारखान्याचे दहा वर्षे अध्यक्ष असताना त्यांनी त्यावेळेस अधिकचा दर का दिला नाही? त्यांना परिस्थितीची माहिती आहे. कारखाना दर देत असताना सगळ्या गोष्टींचा विचार करूनच दर देत असतो, त्यामुळे निकम यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये.
कारखान्याचे संस्थापक व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील नेहमी म्हणतात, सहकारी संस्था हे काचेचे भांडे आहे त्याला जपले पाहिजे त्याला तडा जाऊ देऊ नका. त्यानुसार कोणतीही सहकारी संस्था चांगले काम करत असताना सहकार क्षेत्राला बदनाम करू नका, असे बाळासाहेब बेंडे म्हणाले.
3,100 रुपये दर देणारा एकमेव कारखाना
शेतकरी संघटनेने भीमाशंकर साखर कारखान्यावर आंदोलन केले त्यावेळी शेतकरी संघटनेचे नेते बालवडकर यांना सांगितले होते की संचालक मंडळाची चर्चा करून त्यानंतर निर्णय घेऊन वार्षिक सभेत कारखान्याचे संस्थापक सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उसाचा अंतिम दर जाहीर करतील. त्यानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 2,750 + 350 = 3,100 रुपयाचा अंतिम दर दिला असून, उत्तर पुणे जिल्ह्यात 3,100 रुपये उसाला प्रतिटन दर देणारा भीमाशंकर एकमेव साखर कारखाना आहे.





