पुणे जिल्हा : माळेगाव कारखान्याला “बेस्ट शुगर फॅक्टरी” पुरस्कार

पुणे येथे पुरस्काराचे थाटात वितरण
माळेगाव – डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन, इंडियातर्फे दि माळेगाव सहकारी साखर कारखान्यास २०२४ चा “बेस्ट शुगर फॅक्टरी” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दि. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडियाची स्थापना (स्व) श्रीमान वालचंद हिराचंद यांनी १९३६ रोजी केली आहे. पुरस्काराचे वितरण पुणे येथे हॉटेल जे डब्ल्यु मेरियटमध्ये झाले.
पुरस्काराचे वितरण प्रेसिडेंट, नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्ट्रीज अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री दिलीप देशमुख, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, दि. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया अध्यक्ष एस. एस. भड आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ऑनलाईन मार्गदर्शनपर भाषण करुन कार्यक्रमास उपस्थिती नोंदविली.
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी माळेगाव कारखान्याचे चेअरमन केशवराव जगताप, व्हाईस चेअरमन तानाजी देवकाते, संचालक बाळासाहेब तावरे, रंजनकुमार तावरे, योगेश जगताप, सागर जाधव, बन्सीलाल आटोळे, तानाजी कोकरे, संजय काटे, सुरेश खलाटे, अनिल तावरे, मदनराव देवकाते, दत्तात्रय येळे, प्रताप आटोळे, नितीन सातव, गुलाबराव गावडे, राजेंद्र ढवाण, स्वप्नील जगताप, पंकज भोसले, संगीता कोकरे, अलका पोंदकुले, मगेश जगताप, नितीन जगताप, भीमदेव आटोळे, कार्यकारी संचालक अशोकराव पाटील, वर्क्स मॅनेजर अनिल वाबळे, चिफ केमिस्ट विकास फडतरे, डिस्टीलरी मॅनेजर नंदकुमार जगदाळे उपस्थित होते.
सहकार क्षेत्रात अव्वल स्थान पटकावले
चेअरमन केशवराव जगताप म्हणाले की, माळेगाव कारखान्याने नेहमीच उच्चांकी गाळप, उच्चांकी दर दिलेला असल्याने सहकारी साखर कारखानदारीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. कारखान्याने नेहमीच साखर कारखानदारीस दिशा देण्याचे काम केले आहे. कारखान्याने साखर उद्योगाच्या व उपपदार्थ निर्मीतीची यशस्वी वाटचाल केलेली आहे. यात संचालक मंडळ, कर्मचारी, अधिकारी, सभासद यांचा मोलाचा वाटा आहे. २०२४.२०२५ चे हंगामाचे पूर्वतयारीसाठी कारखान्यामधील अंतर्गत कामे चालू आहेत. गळीत हंगाम वेळेत सुरु करण्याचे दृष्टीने सर्व विभाग प्रमुख प्रयत्नशील आहेत. सर्व कामांची वेळेत पूर्तता करणेबाबत चेअरमन, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक यांनी सूचना केल्या आहेत. यावर्षी हंगामांत जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.





