पुणे जिल्हा : निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी लाभ द्या

विश्वास ढमढेरे : लाडकी बहीणासाठी पाठपुरावा करणार
तळेगाव ढमढेरे – राज्य शासनाने नुकत्याच सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 1500 पेक्षा जास्त शासनाचे अनुदान लाभ घेणाऱ्या नागरिकांना योजनेतून वंचित ठेवले आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, अपंग योजना, महिला, श्रावण बाळ, विधवा महिला या योजनेतील महिलांना दरमहा 1500 रुपये शासनाचे अनुदान मिळते. या महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहत आहेत. या महिलांसाठी योजना लागू करावी, अशी मागणी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँगेस पक्ष (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे यांनी केली आहे.
याबाबत शिरूर- हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्याकडे सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात या विषयावर लक्षवेधी मांडावी, यासाठी आग्रह धरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ढमढेरे म्हणाले की, संजय गांधी योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी यांना कष्टाची कामे करता येत नाहीत किंवा काम करण्यासाठी मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत. याची खात्री करूनच योजनेचा लाभ मिळत आहे. शासनाकडून मिळणाऱ्या मासिक अनुदानातूनच यातील लाभार्थी यांचे कुटुंब चालते.
शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सर्वसामान्य महिलांसाठी सुरु केली. त्याबद्दल सरकारचे स्वागतच आहे. परंतु ज्या अपंग, विधवा, परितक्त्या, श्रावण बाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना कोणताच आर्थिक स्रोत उपलब्ध होत नाहीत. अशा शासनाच्या मिळणाऱ्या अनुदानातून पोटाची खळगी भरणाऱ्या या महिला मुख्यमंत्री यांच्या बहीण नाहीत का, असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.
वंचितांसाठी आंदोलन करू
ढमढेरे म्हणाले की, अट रद्द करून सर्व महिलांना कसा शासनाचा जास्तीत जास्त महिला या योजनेत सहभागी होतील यासाठी शासनाने प्रयत्न करावे. अन्यथा योजनेपासून वंचित राहणाऱ्या या गोरगरीब महिलांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँगस पक्ष शरद पवार आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला.





