Pune District : वाल्हे परिसरात बेंदूर उत्साहात

घराघरात पुरणपोळीचा घमघमाट, सर्जा-राजाच्या घुंगरांचा मंजूळ नाद
वाल्हे – घराघरात पुरणपोळीचा घमघमाट, सजवलेल्या सर्जा-राजाच्या घुंगरांचा मंजूळ नाद आणि त्यांच्याप्रती कृतज्ञतेने ओथंबलेले शेतकर्यांचे मन… हे चित्र ग्रामीण भागात उत्साहात साजर्या होणार्या बेंदूर सणाचे दिसून येत होते. शेतकर्यांचा सखा असलेल्या सर्जा-राज्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करणारा बेंदूर हा सण मांडकी, पिसुर्टी, जेऊर व परिसरात मोठ्या उत्साहात पारंपरिक आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक पडल्याने, परिसरातील ओढे- नाले बंधारे ओसंडून वाहत असून परिसरातील खरीप हंगामातील पेरणीची कामेही आटोक्यात आली आहेत. अशातच बेंदूर सणानिमित्ताने बैलांबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न परिसरात शेतकरीवर्गामधून करण्यात आला आहे. पुरंदर तालुक्यातील काही भागात बेंदूर सण साजरा करण्यात येतो. कृषी संस्कृतीमध्ये बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सणाचे महत्त्वाचे स्थान आहे.
सकाळीच बैलांना आंघोळ घालून, नवीन वेसण, म्होरकी, कंडा बैलांना घातला होता. बैलांच्या अंगावर विविध रंगांचे ठसे उमटवले होते. त्यानंतर दुपारी बेगड, झूल, रंग, शिंगांना बेगड, बाशिंग, फुगे, हिंगुळ आदी साहित्याने बैलांना सजवण्यात आले. त्यानंतर बैलांची पूजा करून त्यांची मिरवणूक काढण्यात आले. सायंकाळी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशा, बँड आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमधून आल्यानंतर बैलांची तसेच गायी, वासरे आदींची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.
यावेळी पिसुर्टीचे माजी सरपंच अशोक बरकडे, बाळासाहेब चोरमले, दादासाहेब बरकडे, माणिक चोरमले, मांडकी येथील पोलीस पाटील श्रीतेज जगताप, सुधीर जगताप, विठ्ठल भोसले, राहुल जगताप, ज्ञानेश्वर जगताप, धनाजी शेटे, राहुल जगताप, गिरीष जगताप, श्रीकांत जगताप, तेजपाल सणस, सुनिल गुरव,
यश साळुंके, जेऊर येथील माजी सरपंच प्रतिक धुमाळ, दत्तात्रेय धुमाळ, खाशाबा तांबे, प्रवीण बरदडे, अप्पासाहेब धुमाळ, शैलेश धुमाळ, नारायण धुमाळ, गणपत तांबे आदींसह अनेक शेतकरीवर्गामधून यावर्षी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.





