पुणे जिल्हा बॅंकेत लवकरच भरती

पुणे – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील लेखनिक पदाच्या भरतीसाठी नेमलेल्या एजन्सीला काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब स्पष्ट होताच लेखनिक पदाच्या 356 जागांसाठी भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. संबंधित एजन्सीकडून उमेदवारांचा डेटा मागविण्यात आला आहे. त्यानंतर लवकरच ही भरती सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आले.
पुणे जिल्हा बॅंक भरती प्रक्रियेत गौडबंगाल, या शीर्षकाखाली दैनिक प्रभातमध्ये शुक्रवारी सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यानंतर रखडलेली भरती प्रक्रिया उजेडात आली. लेखनिक पदाच्या 356 जागांसाठी बॅंकेने जुलै 2021 मध्ये भरती प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी सुमारे 31 हजार उमेदवारांनी अर्ज केले. दोन वर्षे झाले, तरी बॅंकेची भरती प्रक्रिया पुढे सरकली नाही. यासाठी बॅंकेने नेमलेल्या एजन्सीबाबत तक्रारी आल्या. तसेच या एजन्सीला काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
यासंदर्भात जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे म्हणाले, जिल्हा बॅंकेने संबंधित एजन्सीकडून उमेदवारांची माहिती असलेला डेटा मागविण्यात आला आहे. संचालक मंडळ या भरती प्रक्रियेसंदर्भात लवकरच निर्णय घेणार आहे. तसेच ज्या उमेदवारांची वयोमर्यादा उलटून गेली असेल, अशा उमेदवारांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात येईल.




