भोर – तालुक्यातील वीसगाव खोऱ्यात गणेश चतुर्थी सण मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा केला जातो. गणेश उत्सव तीन आठवड्यावर येवून ठेपला आहे, कारागिरांची गणेश मूर्तीवर रंगांचा शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू आहे. भोर तालुक्यातील उत्रौली गावात मूर्ती निर्मितीतील सुबकता आणि आकर्षक रंगसंगती तसेच आकर्षक सुंबक चैतन्यमय गौराईचे माहेरघर उत्रौली असल्याने येथील गौराई,गणेश मुर्तींना मागणी जास्त आहे.येथील गणेशमूर्तिकार हजारोंच्या संख्येने गणेशमूर्ती व गौराई घडविण्याचे काम करीत असतात, उत्रौली व पंचक्रोशीत तयार होणाऱ्या गौराई व गणेशमूर्तींना शेगाव, लातूर,बूलडाणा, मुंबई, ठाणे, रायगड रत्नागिरी लालबाग, धुळे, गुजरात वापी,सुरत, बडोदा, दिल्ली, मद्राससह परदेशात इंग्लंड, अमेरिका येथे गौराईंना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मूर्तिकार दिवस रात्री जागवून मूर्तींचे रंगकाम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गणेश मुर्तीची उंची,शाडुची माती,लाल माती,मुलतानी मातीचा वापरावर भर द्यावा लागतो,वाढलेली मजुरी, कच्च्या मालाच्या किमतीत १० % वाढ, रंगांची १०% वाढ, इमिटेशन ज्वेलरी १० %यामुळे गणेशमूर्तीची किंमत १०% ने वाढणार आहे.असे असले तरी गणेशमूर्तिकार गणेश मूर्ति वर शेवटचा हात फिरवित आहेत, रेखीव सुबक आकर्षक तसेच योग्य रंगसंगतीचा वापर करून गणेश मूर्ति तयार केल्या जातात, लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, पुण्यातील मानाचे पाचही गणपती, दागिना विरहीत दगडुशेठ सिध्दिविनायक, विठ्ठल, बालाजी रुप, शारदा गणेश,मानाचे गणपती कसबा,गुरुजी तालीम, तुळशीबाग ,बालगणेश, टिटवाळा पाच आकारात, दगडूशेठ गणपती आठ आकारात,हरणधारी,कमळात विराजमान झालेली, शेषनाग, लालबागचा राजा चार आकारात,फुलावरील विराजमान ,भटरुपातील गणेश, विविध सिंहासनाधीश्वर गणेश चौरंग पद्मासन,शिवरेकर, फेटाधारी जय मल्हार, जय हनुमान, बाहुबली, बालगणेशा, तांडव अवतार, शिवअवतार, उंदीर रथ,आकर्षक मूषक सेट,सिध्दीविनायक,चरण पूजनाचे गणपती,यासह ९५ प्रकारच्या गणपती मुर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे,हसरी खळीची गौराई,अंबाडा खळी,चंदन स्कीन अशा नाविन्यपूर्ण गौराईंना मागणी आहे. उत्रौली गावात साधारणपणे १५ हजार गणपती व गौरीचे ६० हजार जोड ,व लक्ष्मीचे पाऊल,मुषक,बाळ, हरतालिका, भातुकलीच्या खेळातील जाती,भांडी, तुळशीवृंदावन, कृष्ण बनविले जातात.मूर्ती साच्यातून काढणे, घासणे, आकर्षक रंगसंगतीत ती रंगविणे, प्लास्टिकच्या वेष्टनात गुंडाळून खोक्यात गवत भरून मूर्तीचे पॅकिंग करणे अशी कामे रात्रंदिवस सुरू आहे.बाप्पांची मूर्ती रंगवण्याचे काम अंतिम टप्प्यात असून नागरिक, आबालवृद्ध मूर्ती शाळांमध्ये रंगविलेल्या आकर्षक रंगसंगती, देखण्या बाप्पांच्या मूर्ती पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.या गणेश कला मंदिरात अनेक प्रकारच्या मुर्ती पहावयास आणि आपल्या आवडत्या रंग संगती नुसार गणेश मूर्ती उपलब्ध होत असल्याने भाविकांनी गणेश कला मंदिरात गर्दी केली आहे. ५९ वर्षांची परंपरा असलेला जयश्री गणेश कला मंदिर (गौरी गणपती कारखाना) अविरत चालू आहे . कारखान्यामध्ये बारा महिने ३७ महिला,८ पुरुष कुशल कारागीर मूर्ती घडवण्याचे काम करतात. उत्कृष्ट दर्जाच्या सर्वांग सुंदर गौरी व गणेश मूर्ति बनवल्या जातात,गणेश चतुर्थी उत्सव हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.कारखानदार, कलाकार, कारागिरांचे अविरत कष्ट, त्यांची चिकाटी, प्रामाणिकपणा, नवे देण्याचा प्रयत्न, कुशलता यामुळे आराध्य दैवत गणरायाचा मागणी जास्त आहे. सिताराम कुंभार जेष्ठ मुर्तिकार उत्रौली (ता.भोर) महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे आगमन जवळ आल्याने गणेश मुर्तीवर शेवटचा हात फिरवला जात आहे, गणेश मुर्तींना रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चांगली मागणी राहील.शाडुमाती व जिप्सम पावडर ही राजस्थानवरुन मागवली जाते.इकोफ्रेण्डली कलर, पेण पुणे येथून मनपसंत कापड सुरत वरुन मागविले जाते.कास्टिंग, फिनिशिंग, पेंटिंग, पॅकिंग, या विभागानुसार कारागीर कामाला गती देत आहेत.सद्या गणेश भक्त गणेश मुर्ती बुकींग करण्यासाठी कारखान्यात गर्दी करीत आहेत. -सुनिता कुंभार -अध्यक्ष भोर तालुका महिला कुंभार समाज उत्रौली (ता.भोर)