पुणे जिल्हा : इच्छुकांनी चर्चा करून नाव कळवावे

नारायणगावात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पवारांचे आवाहन
नारायणगाव – जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपापसात चर्चा करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांकडे नावे कळवावी असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी केले.
नारायणगाव येथे शरद पवार यांनी शनिवारी (दि.20) जुन्नरच्या दौर्यावर असताना ते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत बोलत होते. पवार यांनी यावेळी अनेक कार्यकर्त्यांची संवाद साधला. तसेच विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात त्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. जुन्नरचा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा असून लोकसभेत आमच्यासोबत ज्या कार्यकर्त्यांनी काम केले त्यांनाबरोबर घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल, असे सांगितले.
हे आहेत इच्छुक
मोहित ढमाले, शरद लेंडे, अंकुश आमले, सत्यशील शेरकर, आनंदराव चौगुले, तुषार थोरात .
आमदार बेनकेंनी घेतली भेट
आमदार अतुल बेनके यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली. भेटीत बर्याच वेळ चर्चा झाली असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना अतुल बेनके माझे मित्र स्व. वल्लभ बेनके यांचे पुत्र असून तालुक्याचे आमदार आहेत. त्यांनी माझी भेट घेणे यात काही वावगे नसल्याचे स्पष्ट केले





