जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत पुरंदरचे समर्थक दाखल
पुणे/ दौंडज : पुण्यातील भाजपाच्या कार्यसमितीच्या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी टेकवडे यांचा नड्डा यांच्या हस्ते पक्षप्रवेश करून घेण्यात आला. यावेळी टेकवडे यांच्या समर्थकांनी पक्ष प्रवेश केला. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात हा प्रवेश सोहळा झाला.
दरम्यान, माजी आमदार टेकवडे यांनी (दि. 18) सकाळी सासवडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार करीत अभिवादन केले. 200 ते 300 गाड्यांचा ताफा पुण्याकडे घेऊन जात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. पुरंदरमधील राष्ट्रवादी व कॉंग्रेसमधील बहुतांश कार्यकर्त्यांना घेऊन कॉंग्रेस व राष्ट्रवादीला खिंडार पाडत भाजपमध्ये प्रवेश केला.
जिल्ह्यात प्रवेशाची जोरदार चर्चा होती, यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, पंकजाताई मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जालींधर कामठे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.