बारामती : कृत्रिम बुद्धिमत्ता ही जागतिक परिवर्तनाची नांदी मानली जात आहे. या तंत्रज्ञानामुळे शेती, उद्योग ,आरोग्य तसेच शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडतील असा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे उसाचे एकरी १२० टन उत्पादन शक्य असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.
बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या कृषक २०२५ या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी पवार बोलत होते. कार्यक्रमास यावेळीमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे,खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी संचालक अजित जावकर, नाबार्डच्या रश्मी दराड, मायक्रोचे इंडियाचे चेअरमन राजेंद्र बारवाले, एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार, चेअरमन राजेंद्र पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, ए आय तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे आहे. महाराष्ट्र राज्यात कृषी क्षेत्रात उसाच्या शेतीवर मोठ्या प्रमाणावर अर्थकारण अवलंबून आहे.उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून उसाच्या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी या तंत्रज्ञानाद्वारे लक्ष केंद्रित केले आहे. कमीत कमी पाणी व कमी उत्पादन खर्चात भरघोस उत्पादन या तंत्रज्ञानाने शक्य आहे. महाराष्ट्रात त्याचे प्रयोग सुरू आहेत. १ हजार शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर ऊस पिकासाठी करीत आहेत. जागतिक स्तरावरील मायक्रोसॉफ्ट तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठ या दोन संस्था कृषी विज्ञान केंद्रशी जोडल्या गेल्या आहेत.
या संस्थांच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणार आहे. नवीन तंत्रज्ञानाबरोबरच सुधारित वानांची देखील गरज असल्याचे पवार म्हणाले. जिरायती शेतीचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असून जिरायत भागातील शेतकऱ्यांना आश्वासक उत्पादन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कृषी विज्ञान केंद्रच्या माध्यमातून ते शक्य असल्याचे पवार म्हणाले. केंद्राने राज्य सरकारची मदत यासाठी घ्यावी लागेल. बारामतीत सुरू असलेल्या या तंत्रज्ञानाचा लाभ राज्यातील कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यास झाल्यास शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होईल असे मत पवारांनी व्यक्त केले. कृषी प्रदर्शन पाहून पंकजा मुंडे म्हणाल्या की, बारामतीकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. लोकसंख्या वाढत आहे उत्पादन वाढवावे लागणार आहे त्याचा दर्जाही टिकवावा लागेल. ये आय तंत्रज्ञानाद्वारे हे शक्य होणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, विद्या प्रतिष्ठान व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे कृत्रिम बुद्धिमत्ता लॅब कोर्स सुरू झाला आहे. गेले सहा महिन्यापासून ही लॅब सुरू झाली आहे. देश पातळीवरील तसेच जागतिक तंत्रज्ञान आता बारामतीत आत्मसात करता येणार आहे.
राजेंद्र पवार म्हणाले की, गेले दहा वर्षात प्रदर्शनाला लाखो शेतकऱ्यांनी भेट दिली. प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना फायदा झाला. भविष्यात शेतकऱ्यांना ग्लोबल वार्मिंगला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे खरीप रब्बी हंगामी शेती कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान येथून पुढील काळात महत्त्वाचे ठरेल.