आळंदी : येथून जवळच असलेले सोळू (ता. खेड) येथे आळंदी मरकळ रस्त्याच्या शेजारी यात्रेनिमित्त कुस्त्यांचा आखाडा सुरू असताना आळंदीकडून मरकळच्या दिशेने जाणार्या एका मद्यपी चालकाने स्विफ्ट डिझायर गाडीने अचानकपणे शेजारी उभ्या असणार्या दुचाकी वाहनांना धडक देऊन झाडाला जोरात धडक दिली. या चार दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोठा आवाज झाल्याने कुस्ती पाहणारे सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी यांची मोठ्या प्रमाणात घबराट निर्माण झाली. रोडच्या दिशेने धाव घेऊन सगळा मोठा गोंधळ उडाला. पहाणी केली असता गाडीमधील वाहन चालक दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलीस स्टेशन आळंदी येथे फोन केल्याने पोलीस कर्मचारी उपस्थित झाले. वाहन चालकाला आळंदी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.