Pune District : सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते एकजूट

तळेगावात हेवेदावे बाजूला ठेवून संघर्षात सहभागी
तळेगाव ढमढेरे – ब्रिटिशकालीन तळेगाव ढमढेरे हे तालुक्यातील महत्त्वाचे महसूल गाव म्हणून ओळखले होते. बाजारपेठ होती. गावात तालुक्यातील सर्वच पक्ष, संघटनाचे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय महत्वाची पदे भूषवणारी पदाधिकाऱ्यांचे गाव म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. झेडपी आणि पंचायत समितीच्या गट, गण रचनेच्या प्रारून आराखड्यात गावाचे अस्तित्व धोक्यात आल्याने सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, गावकरी एकत्र येत एकजुटीची वज्रमूठ बांधली आहे.
तळेगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (दोन्ही गट), शिवसेना (दोन्ही गट), भाजपा, काँग्रेस पक्ष, मनसे, रिपब्लिकन पक्ष, शेतकरी संघटना, बसपा अशा विविध पक्षाचे तालुक्यासह जिल्ह्याची प्रमुख पदाधिकारी तळेगाव ढमढेरेत आहेत. वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असल्याने पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची बांधणी करू लागला. मतभेद वाढले. गटा- तटाचे राजकारण सुरू झाले. विकासकामांकडे दुर्लक्ष होत राजकीय पक्ष मोर्चेबांधणीस वेग वाढला. याचा परिणाम विकासकामांवर झाला. येणाऱ्या निधीला आडकाठी होऊ लागली. विकासकामांचा श्रेयवाद सुरू झाला. कधी गावातली पदे दुसरीकडे गेली हे स्थानिक नेत्यांना समजलेच नाही.
तालुकास्तरीय प्रत्येक सहकारी संस्थावर तळेगावातच सर्वाधिक सदस्य व पदाधिकारी होते. परंतु काही वर्षांच्या काळात अंतर्गत मतभेद वाढल्याने अनेक संस्थेचे पद, स्थानिक स्वराज्य संस्था हातातून निसटल्या होत्या. जिल्हा परिषद प्रारूप आराखड्यात तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गटाचे नावही गेले. दोन गटांत विभाजन झाल्याने गावकऱ्यांना व नेत्यांना भविष्यातील नुकसान दिसू लागले. गावकरी संतापले. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची एकजूट झाली. सर्वपक्षीय बैठक यशस्वी झाली. गाव बंद व निषेध सभेचा नारा दिला.
एकमेकांविरोधात भाष्य करणारे नेते व कार्यकर्ते एकत्रित निषेध सभेच्या नियोजनात दंग झाले होते. सोशल मीडियातून गावबंदची हाक दिली. (दि.18) विशेष ग्रामसभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती. सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन गावासाठी लढा देताना एकोप्याचा संदेश गावकऱ्यांना मिळाला.
एकत्र सामोरे जाण्याची गरज
गावातील पक्षीय राजकारण व गटातटाच्या भूमिका यामुळे स्थानिक स्वराज्य व सहकार संस्थेच्या निवडणुकीत गावचे मतदान अधिक असूनही अलीकडच्या काळात गावच्या पदरात कोणतेच पद मिळत नसल्याचे दिसून आले. आगामी काळात अशीच एकजुटी दाखविली तर जिल्ह्याच्या राजकारणात गावचा गावचा वलय निर्माण होईल, असा सूर उमटत आहे.
तळेगाव ढमढेरे गाव ऐतिहासिक व राजकीयदृष्टया यांच्या मोठे गाव असून गावात विविध जाती, धर्माचे लोक एकोप्याने राहतात. गावची दोन जिल्हा परिषद गटांत झाल्याने मतदार दुखावले गेले आहेत. गाव एकसंघ ठेवून तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट पूर्ववत करण्यासाठी गट- तट बाजूला ठेवून एकत्र लढाई लढणार आहोत.
– विश्वास ढमढेरे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, (शरद पवार गट).
सर्वपक्षीय पदाधिकारी गावासाठी एकत्र आल्याने तळेगाव ढमढेरेचा जिल्हा परिषद गटाचा राज्यभर गाजला. आम्ही आमची मागणी संविधानिक पद्धतीने मांडणार आहोत. त्यासाठी संपूर्ण गावकरी एकजूट झाले आहेत.
– बाळासाहेब नरके, माजी उपाध्यक्ष, पुणे जिल्हा बँक.
तळेगाव ढमढेरे गावाची दोन जिल्हा परिषद गटांत विभागणी व गटाचे बदलेले गेलेले गाव हे पूर्ववत करण्यासाठी तसेच नवीन प्रारूप आराखडा गावच्या हिताचा नसून यावर जिल्हाधिकारी यांच्या हरकत दाखल करणार आहोत. गावाला योग्य न्याय मिळाला नाही तर सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून आम्ही उपोषण करणार आहोत.
– राजेंद्र ढमढेरे, अध्यक्ष, शेतकरी संघटना शिरूर तालुका.
तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट हा जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून अस्तित्वात आहे. यापुढेही तसाच राहावा. नवीन गटरचनेबाबत जास्तीत जास्त हरकती कशा जातील, यासाठी सर्वपक्षीय अंतर्गत मतभेद दूर करून एकजुटीने प्रयत्न करीत आहोत. पक्षाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबतचे पत्र देऊन व प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती दिली आहे.
– आरती भुजबळ, माजी सभापती, पंचायत समिती, शिरूर.





