Pune District :आळेफाटा जि. प. शाळा, कालव्यात कचरा

अज्ञाताचे कृत्य ;पाणी प्रदूषण तर विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
बेल्हे – आळेफाटा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ तसेच पिंपळगाव जोगा कालव्यात अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी कचरा टाकणा-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
आळेफाटा (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा पिंपळगाव जोगा कालव्याच्या कडेला असून, या ठिकाणी दररोज रात्री अज्ञात व्यक्ती कचरा टाकत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटून कचराकुंडीचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे. तसेच या ठिकाणी आलेल्या पिंपळगाव जोगा कालव्यात देखील मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. पुणे – नाशिक महामार्गालगत अज्ञात रहिवासी तसेच अज्ञात दुकानदार या पिंपळगाव जोगे कालव्यामध्ये कचरा टाकतात, त्यामुळे कालव्याच पाणी प्रदूषित होत आहे.
आळेफाटा या ठिकाणी मोठी बाजारपेठ असून, ग्रामपंचायत हद्दीतील सगळा कचरा गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीची स्वतंत्र यंत्रणा (घंटागाडीची) सोय असताना देखील या ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने सगळीकडे कचराच दिसत आहे. तसेच ज्या ठिकाणी हा कचरा साचत आहे. त्याच्या काही फुटांच्या अंतरावर शिवछत्रपती विद्यालय व जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे.
या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे जवळपास सहाशे ते सातशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या कचर्याचा ढिगामध्ये प्लॅस्टीक, शिळे अन्न कुजलेल्या अवस्थेत पडलेले असून या ठिकाणी दुर्गंधी येत असून यांचा त्रास या ठिकाणी येत असलेल्या मुलांना होत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असून या शाळेत प्रवेश करत असताना विद्यार्थ्यांना दररोज नाकाला रूमाल लावूनच प्रवेश करावा लागतो आहे.
सध्या पावसाला सुरुवात झाली असून पावसाचे पाणी या कच-यात साचत असल्याने हा कचरा सडु लागल्याने या परीसरात रोगराईचे प्रमाण वाढणार आहे. तसेच जे नागरीक कचरा टाकत आहेत त्यांच्यावर ग्रामपंचायतीने कडक कारवाई करावी, अशी मागणी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश गडगे यांनी केली आहे.
या ठिकाणी ग्रामपंचायतीची गाडी वेळेवर जात आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने येथे कचरा टाकू नये, असा सूचनाफलक लावला आहे. तरीही स्थानिक का कचरा टाकतात असा प्रश्न निर्माण होत आहे. या पुढे कचरा टाकताना आढळल्यास मोठ्या स्वरूपाचा दंड आकारला जाईल.
-रेलिका जाधव, सरपंच वडगाव आनंद





