दिवे : जिल्हा नियोजन समितीवर राज्य सरकारने दोन राजकीय व्यक्तींची नामनिर्देशित म्हणून नियुक्ती केली असून यामध्ये दौंडमधील भाजपचे आमदार राहुल कुल आणि मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान जिल्ह्यात २१ पैकी १८ आमदार महायुतीचे आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या गटातील आमदारांना प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. तर पुणे जिल्ह्यात शिंदे शिवसेनेचे विजय शिवतारे एकमेव आमदार असून सुद्धा त्यांना डावलले गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अजित पवार यांनी पालकमंत्रिपद आपल्या ताब्यात ठेवतानाच जिल्हा नियोजन समितीवर आपली पकड मजबूत करीत शिवतारे यांना धक्का दिल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्यांची मुदत संपल्याने सध्या प्रशासक राज सुरु आहे. पालकमंत्री अजित पवार हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य म्हणून तर जिल्हा नियोजन अधिकारी संयोजक म्हणून कामकाज पाहत आहेत. समितीच्या नियमानुसार जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार किंवा खासदार यांना सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात येते आणि हे सदस्य जास्तीत जास्त दोनच असतात. पुणे जिल्ह्यात चार खासदार असून यापैकी पुण्यातील महायुतीचे मुरलीधर मोहोळ केंद्रीय मंत्री आहेत. तर मावळचे श्रीरंग बारणे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आहेत. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या आहेत. जिल्हा नियोजन समितीवर एकंदरीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेच वर्चस्व दिसून येत आहे. आमदार विजय शिवतारे पुरंदर मधून निवडून आलेले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून परिचित आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार रान उठविले होते. मात्र महायुती असल्याने ऐनवेळी त्यांना माघार घ्यावी लागली होती. मात्र सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांना राज्यसभेतून एंट्री करावी लागली आहे. तर विधान सभा निवडणुकीत अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काम करणारे माजी आमदार संजय जगताप आणि माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांचाही पराभव घडवून आणला हे सर्वश्रुत आहे. डीपीडीसी वर शिवतारे का नकोत ? आमदार विजय शिवतारे यांचे बारामतीला दिल्या जाणाऱ्या प्रत्येक निधीवर बारकाईने लक्ष असते. २०१४ पूर्वी आमदार असताना शिवतारे यांनी अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांनाही धारेवर धरल्याचे सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत शिवतारे यांना पुन्हा डीपीडीसीवर घेतल्यास इतरांपेक्षा शिवतारे यांचा सर्वात जास्त विरोध सहन करावा लागणार याची अजित पवारांना चांगली माहिती आहे. त्या तुलनेत आमदार राहुल कुल आणि सुनील शेळके हे सॉफ्ट कॉर्नर आणि विरोध न करणारे आहे. त्यामुळे जरी त्यांना समितीवर घेतले तरी निर्णयांना फार विरोध करणारे नाहीत हे अजित पवार यांना पक्के माहिती आहे. त्यामुळे महायुतीत असूनही अजित पावर यांनी संपूर्ण शिंदे गटाला धक्का देत शिवतारे यांना परस्पर बाजूला ठेवले आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. 30) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुरंदरला येत असून विजय शिवतारे यांनी जाहीर केलेल्या कोणत्या प्रकल्पाबाबत भूमिका जाहीर करणार तसेच पुरंदर विमानतळ प्रकल्प याबाबत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.