अजित पवारांकडे व्यथा मांडल्या : कात्रजचे अध्यक्ष ढमढेरेंसह पदाधिकारी सक्रिय तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे गावाचे झेडपी आणि पंचायत समितीच्या गट आणि गणाच्या पुनर्रचनेत अस्तित्व धोक्यात आणल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला. सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकजूट बांधली. त्यात अजित पवार गटाने थेट याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडे साकडे घातले आहे. तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद हा पूर्ववत होण्यासाठी गावातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे प्रमुख व उपमुख्यमंत्री पवार यांना पत्र पाठवून न्याय मिळवून देण्यासाठी साद घातली आहे. नव्याने शासनाने जिल्हा परिषदेचा आराखडा जाहीर झाला आहे. यामध्ये गावाचे जिल्हा परिषद गट म्हणून नाव पुसून टाकले. याची दखल घेत तळेगाव ढमढेरे येथील पुणे दूध संघाचे चेअरमन स्वप्निल ढमढेरे, माजी सभापती व शिरूर महिला तालुकाध्यक्षा आरती भुजबळ, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष महेश ढमढेरे यांनी तळेगाव ढमढेरे गावाला तळेगाव ढमढेरेच जिल्हा परिषद गट नाव असावे व प्रभाग क्रमांक १ हा सणसवाडी गटात विभागला आहे. प्रभाग क्रमांक २- ६ हा भाग शिक्रापूर गटात गेला असून संपूर्ण गाव एकसंघ राहावे यासाठी गट रचनेत बदल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तळेगाव ढमढेरे गट विभागणी व गटाचे नाव पूर्ववत करण्यासाठी तळेगावचे ज्येष्ठ पदाधिकारी कमिटी यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गटाची नव्याने झालेली रचना यात बदल करण्यात यावा यासाठी मागणी केली आहे. सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून तळेगावकरांसाठी योग्य तो न्याय दिला जाईल, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे. – ॲड. स्वप्निल ढमढेरे, चेअरमन कात्रज दूध संघ.