Pune district : तीन दिवसानंतर यवत अंशत: पूर्वपदावर

५ तास दुकाने खुली : जमावबंदीचा सर्वसामान्य, व्यापाऱ्याना भुर्दंड
न्यायालयात आरोपीना उद्या हजर करणार
यवत : गेल्या काही दिवसांपासून यवत परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा आणि सुव्यस्थाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या मागणी नुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. मात्र, तीन दिवस उलटून गेले तरी अजूनही हा जमावबंदी आदेश जैसा थे होता. मात्र, रात्री उशिरा पोलीस प्रशासनाकडून तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार पुढील आदेश येईपर्यंत सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत अशी अंशतः शिथिलता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
सलग तीन दिवस यवत गावातील सर्व अत्यावश्यक सेवा वगळता यवत गाव, दुकाने, हॉटेल्स हे पूर्णपणे बंद होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि कामगार यांनी किराणा मालाच्या व तरकारी दुकानावर थोडी गर्दी केली होती. गावात सर्वत्र पोलिसांचा आणि राज्य राखीव दलाचा मोठा चोख बंदोबस्त आहे. सध्या यवतमध्ये शांततेचे वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
यवत येथे जमावबंदी आदेश लागू असल्याने सलग तीन दिवस संपूर्ण बाजारपेठ बंद होती. मात्र, झालेली घटना दुर्दैवी होतीच याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिक,कामगार वर्ग आणि छोटे व्यावसायिक यांना सर्वाधिक बसल्याचे चित्र सध्या यामुळे पाहायला मिळत आहे. दररोज गावातील आणि परिसरातील कामगार वर्ग कामावर जाऊन आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. मात्र अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सर्वसामान्याचे जनजीवन विस्कळीत झाले असल्याने त्यांच्या रोजगाराचा देखील प्रश्न यामुळे निर्मान झाला आहे. त्यांचे आर्थिक नुकसान देखील झाले आहे.
यवत आणि परिसरात सर्वत्र शांतता पसरलेली आहे. गावात चौका- चौकात पोलिसांनी मोठा बंदोबस्त आहे. मात्र, गावात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे नागरिक आणि हातावर पोट असलेल्या नागरिकांना मात्र मोठा त्रास होऊ लागला आहे. सध्या यवत परिसरातील नागरिक कामगार आणि व्यावसायिक बाजारपेठेत खरेदीसाठी येत असे. मात्र, त्यामुळे यवत गावातील बाजारपेठेसह आर्थिक उलाढालीवर देखील फार मोठा फटका बसल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे यवतची बाजारपेठ पुन्हा कधी सुरळीत सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
रक्षाबंधनामुळे छोटे व्यावसायिक अडचणीत
यवतमध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जमाबंदी लागू करण्यात आले आहे. (दि.९) भावाबहिणीच्या अतूट नात्याचा रक्षाबंधन सण आहे. यवत येथील छोटे छोटे व्यापारी दुकानदार, तरकारीवाले यांनी हजारो लाखो रुपयांचा राखीचा माल आपल्या दुकानात भरला आहे. त्याचप्रमाणे छोटे तरकारी विक्री करणारे व्यावसायिक देखील उधारीवर माल घेऊन व्यवसाय करतात. तीन दिवस संपूर्ण गाव बंद झाल्याने त्यांचे तारकरीचा माल खराब होऊन फार मोठे नुकसान झाले आहे. हातावर पोट असल्याने ज्या व्यापाऱ्याकडून उधार माल घेतला आहे. त्याला मात्र पैसे देणे चुकणार नाही, असे देखील बोलताना तरकारी विक्री करणाऱ्यानी व्यथा मांडल्या.
दाखल गुन्ह्यात गावातील तरुण फरार
झालेल्या घटनेमुळे यवत पोलिसांनी जवळपास ९३ जणांवर व अज्ञात ५०० ते ६०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी १७ आरोपीना अटक केली आहे. त्यांना बुधवार (दि. ६) न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसाकडून दिली जात आहे. मात्र, गावातील युवक आपले नाव यात आहे का, त्यांचे पालक आपल्या मुलाचे नाव आहे का, यामुळे भयभीत झाले आहे. युवक गावातून फरार झाले असल्याची वस्तुस्थिती दिसून येत आहे.





