Pune District : वाघोली-केसनंद रोडवर खड्ड्यांमुळे अपघात

वाहतूक कोंडी ; नागरिक संतापले
वाघोली – पावसाळ्यात चेंबरमधून बाहेर येणारे पाणी, पावसाचे पाणी वाघोली-केसनंद रोडवर सातत्याने वाहत असल्याने वाहनांची वाढलेली वर्दळ व पाण्यामुळे याठिकाणी प्रचंड खड्डे पडले असून खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. तात्पुरते खड्डे बुजविण्यात आले तरी पुन्हा खड्डे पडत असल्याने दररोज अनेक अपघात येथील रहिवाशांना पहावयास मिळत आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या समस्येवर प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार, असा सवाल नागरिक करीत आहेत.
वाघोलीत पडत असलेल्या पावासामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी साचत असल्याने बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसत असतानाच दरवर्षी केसनंद रोडवरील या खड्ड्यांच्या समस्येला पावसाळ्यात दररोज सामोरे जात आहे. चेंबर मधून ओव्हरफ्लो होऊन वाहणारे ड्रेनेजचे पाणी, पाण्यामुळे पडणारे खड्डे, खड्ड्यांमुळे होणारे अपघात, वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगा, खड्ड्यांवर तात्पुरती केली जाणारी मलमपट्टी केसनंद रोडवर वास्तव्यास असणारे नागरिक तसेच वाहनचालकांना सवयीचे झाले आहे.
केसनंद रोडवर काही रस्ता काँक्रीटीकरणाचा तर काही रस्ता डांबरी आहे. डांबरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. डांबरी रस्ता काँक्रिट करणे गरजेचे होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करून दरवर्षी डांबरीकरण करून भागविले जाते. पाऊस सुरु झाला की डांबरी रस्त्याची दुरवस्था होते. हा खेळ अनेक वर्षापासून सुरू आहे. वाहणारे सांडपाणीही महापालिका बंद करू शकलेली नाही.
पुणे नगर रोडच्या पावसाळी वाहिनीला अनेक सोसायट्यांनी सांडपाणी वाहिनी जोडल्याने ते पाणी ओव्हरफ्लो होऊन केसनंद रस्त्यावर येत आहे. याबाबत बैठका झाल्या की सोसायट्यांवर कारवाईचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून मिळते. प्रत्यक्षात कारवाई होत नाही. नागरिक लोकप्रतिनिधी, पालिका अधिकाऱ्यांकडे सातत्याने संताप व्यक्त करीत असतात. मात्र, यावर ठोस उपाययोजनाच केली जात नसल्याने नागरिकांना मात्र मुकाट्याने सहन करण्यापलीकडे पर्याय नाही.
केसनंद रोडला पाणी हमखास
वाघोली परिसरात पावसाने उघडीप दिल्यानंतर अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होऊन पाणी वाहून जाते मात्र केसनंद रोडवर मात्र, पाऊस गेला तरी पुढील काही दिवस पाणी वाहत असते. काळे ओढा परिसरामध्ये केसनंद फाटा ते काळे ओढ्यापर्यंत येणारे पाऊस आणि ड्रेनेजचे पाणी, आयुर्वेदिक कॉलेज ते काळे ओढा येणारे पावसाचे पाणी, आयव्ही इस्टेट परिसरातून मोकळे सोडलेले पावसाचे पाणी काळे ओढा परिसरामध्ये वाहून येते आहे. पाण्याच्या सततच्या वाहण्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग व पुणे मनपाच्या वतीने वारंवार खड्डे बुजवण्यात येत आहे. मात्र, पावसाच्या पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने खड्डे वाढत आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
– रामभाऊ दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य.





