पुणे – पुणे परिमंडलामध्ये छतावरील सौर ऊर्जेचे लघु व उच्चदाबाच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वर्गवारीमध्ये आतापर्यंत २८६ मेगावॅट क्षमतेचे १२ हजार ३९७ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. वीजग्राहकांचा सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जा संवर्धनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार (राहणीमान सुलभता) आणखी तत्पर सेवा देण्यात यावी, असे निर्देश मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी गुरुवारी दिले.
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीसाठी प्रत्यक्ष कार्यवाही करणाऱ्या ९७ अभियंत्यांची एक दिवसीय कार्यशाळा झाली. यावेळी मुख्य अभियंता पवार बोलत होते. कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड, प्रणाली विश्लेषक बाळकृष्ण पाटील, व्याख्याते डॉ. नीलेश रोहणकर, डॉ. संतोष पाटणी यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी ऊर्जा संवर्धनाची शपथ घेण्यात आली.
राजेंद्र पवार म्हणाले की, पुणे परिमंडलामध्ये छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून वेग देण्यात आला आहे. छतावरील सौर प्रकल्प उभारणीसाठी ग्राहकाने अर्ज केल्यापासून प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी तत्पर सेवा द्यावी. काही अडचणी आल्यास त्यासंबंधी ग्राहकांना योग्य माहिती द्यावी. या कार्यशाळेत डॉ. संतोष पाटणी यांनी छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीची प्रक्रिया आणि डॉ. नीलेश रोहणकर यांनी सौर धोरण या विषयावर इत्यंभूत माहिती दिली.