सोमेश्वरनगर : महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षापासून कर्जबाजारी झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. खासगी सावकारीचा आवळत चाललेला फास हे देखील महत्त्वाचे कारण आहे. मात्र, शासनस्तरावरून शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न तोकडे पडत आहे. तरीही शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबत नाहीत. बारामती तालुक्यात सावकारीचे पीक उदंड फोफावले आहे. त्यामुळे वडगाव पोलीस स्टेशन अलर्ट मोडवर आले आहे. खासगी सावकार हाच शेतकरी, सर्वसामान्यांच्या आत्महत्येसाठी प्रमुख जबाबदार आहे. बँका, पतसंस्था यांच्यापेक्षा शेतकऱ्यांना छळायचं काम करतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागे खासगी सावकाराच्या तगादा हे मोठे कारण राहिले आहे. सरकारने कर्जमाफी केली तरी बँकांच्या कर्जाची होते. मात्र, खासगी सावकार आणि पतसंस्था यांची कर्जमाफी होत नाही. त्यामुळेच शेतकरी आज खासगी सावकार आणि पतसंस्थांच्या जाळ्यामध्ये अडकला आहे. त्यांच्याच त्रासाला कंटाळून शेतकऱ्याला गळफास घेण्यापर्यंत जावे लागत आहे. बारामतीत कर्जदारांनीच घेतला सावकाराचा बळी बारामती तालुक्यामध्ये अगदी उलट प्रकार घडला आहे. बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील सावकारालाच कर्जदार शेतकऱ्यांनी कायमचा संपवलाय. १५ लाख रुपये परत मिळवण्यासाठी या सावकाराने तगादा लावला होता. यातूनच या सावकाराचा खून करण्यात आला. यानंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अशा प्रकारे कोणी खासगी सावकार तुम्हाला त्रास देत असेल तर पोलीस प्रशासनाकडे तक्रार नोंदवण्याच आवाहन आता पोलिसांकडून केले आहे. काय आहे सावकार प्रकरण? बारामती तालुक्यातील रोहित गाडेकर हा एक सावकारी व्यवसाय करणारा आहे. सोरटेवाडी गावातील तो रहिवासी होता. त्याच्याच गावातील अमोल वसंत माने, सागर वसंत माने व विक्रम काकासो मासाळ यांना या सावकाराने व्याजाने पैसे दिले होते. मागील काही वर्षांपासून हे लोक त्याला पैसे देत होते. मात्र, व्याज आणि मुद्दल यामध्ये काहीही फरक पडत नव्हता. त्यातच हा सावकार कर्जदाराला मारहाण करत असे. चारचौघात अपमानित करत असे. पण यातूनच या तिघांनी चिडून जाऊन मग या सावकाराला संपवण्याचा कट केला. (दि.५) रोजी रात्री अकरा वाजता या सावकाराला पैसे देतो, असे सांगून एका निर्जनस्थळी बोलून घेतले. त्या ठिकाणी धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. यानंतर याप्रकरणी अमोल माने, सागर माने, यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान खून केलेले हे आरोपी फरार झाले होते. मात्र आरोपींना पोलिसांनी ४८ तासांत जेरबंद केले. याच घटनेतील आणखी एक आरोपी तपासादरम्यान पोलिसांना निष्पन्न झाला. त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता रोहित गाडेकर हा त्यांना व्याजाच्या पैशासाठी त्रास देत होता. व्याजाच्या नावाखाली जास्तीचे पैसे त्यांच्याकडून घेत होता. त्यांना मारहाण करीत होता. म्हणूनच आपण त्याचा खून केल्याची कबुली त्यांनी आरोपींनी दिली. पोलिस प्रशासनाचे आवाहन… आता बारामती तालुक्यातील वडगाव पोलीस प्रशासन खडबडून जाग झाले आहे. आतापर्यंत सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकरी आता सावकाराला संपवायला निघाल्याचे या एका प्रकरणातून निदर्शनास आले. त्यामुळे आता बारामती पोलिसांनी अशा प्रकारची घटना घडत असेल किंवा जर कोण खासगी सावकारकी करीत असेल आणि लोकांना व्याजासाठी त्रास देत असेल तर याबाबतची फिर्याद पोलिसात द्यावी. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. असे वडगाव निंबाळकर पोलिसांनी पत्रकार परिषदेतून सांगितले आहे. खासगी सावकारांना न घाबरण्याचे आवाहन त्यांनी केला आहे. तर खासगी सावकारांना देखील सज्जड दम दिलाय.