रामदरा रस्त्यावरील धोकादायक पूल आजही मूळ जागी, उपाय मात्र फक्त नावालाच लोणी काळभोर – थातूरमातूर या मराठी शब्दाचा अर्थ जर कुणाला समजून घ्यायचा असेल, तर तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्यावरील नवीन मुठा कालव्यावरील धोकादायक पुलाची अवस्था पाहावी! जलसंपदा विभाग आणि संबंधित शासकीय यंत्रणा गेल्या अनेक महिन्यांपासून फक्त तात्पुरते, अपुरे, आणि दिखाऊ उपाय करत आहेत. त्यामुळे ’थातूरमातूर’ या शब्दाचा प्रत्यक्ष उदाहरणातून अर्थ समजावण्याचा विभागाचा ’प्रयत्न’ नक्कीच ’दाद’ देण्यासारखा (?) ठरतो. 1965 साली बांधलेला, आज साठ वर्षांचा झालेला हा पूल दिवसेंदिवस अधिकच धोकादायक बनत चालला आहे. दररोज हजारोंची वर्दळ, भाविकांची गर्दी आणि अवजड वाहनांची ये-जा असतानाही आजपर्यंत या पुलासाठी कुठलीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्थानिक ग्रामपंचायत वारंवार निवेदने देऊन थकली, पण शासनाकडून फक्त फलक लावा, दगड-माती टाका, बांबू उभे करा या थातूरमातूर कृतीच दिसल्या. विशेष म्हणजे फुरसुंगी येथील मालधक्क्यावरून 30-35 टन माल घेणारे डंपर, ट्रक या पुलावरून सर्रास जात असताना पूल अक्षरशः हलतो. काही दिवसांपूर्वीच रात्री बांबू अज्ञातांनी काढून टाकल्यामुळे हे अडथळेही नाममात्र ठरले. कठडे नादुरुस्त, संरक्षक व्यवस्था शून्य, आणि धोका सतत वाढत असतानाही प्रशासन ’अपघात घडल्यावर जागे होण्याची वाट’ पाहत असल्याचे चित्र आहे. याच महाराष्ट्रात इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळून भीषण दुर्घटना झाली होती, त्याचे भयावह स्मरण अजूनही जनतेच्या मनात ताजं आहे. मात्र रामदर्याच्या या पुलाच्या बाबतीतही तेच चक्र पुन्हा फिरत असल्याचे स्पष्ट दिसते. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने थातूरमातूर हाच स्थायीभाव का पत्करला आहे, हा प्रश्न जनतेच्या मनात आहे. नवीन पूल कधी? याचे उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र, एखादी दुर्दैवी घटना घडून गेल्यानंतर ‘दोष कोणाचा?’ या चर्चेपेक्षा, प्रशासनाने आताच पावले उचलून या पूलाचे पुनर्बांधकाम करावे, हीच सर्वसामान्यांची मागणी आहे.