राज्यभरातील भाविक मयुरेश्वरचरणी लीन मोरगाव – ‘कऱ्हेच्या तीरी, असे एक मोरगाव तिथे नांदतो मोरया देवराव, चला जाऊ यात्रेसी, महापुण्य आहे’ या ओळी ऐकल्या की, आठवतो मोरगावचा मयूरेश्वर गणपती. अंगारक चतुर्थीनिमित्ताने अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथे पहाटेपासूनच भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मोरगावला यात्रेचे स्वरूप आले होते. पहाटे पाच ते रात्री उशीरापर्यंत सुमारे एक लाख भाविकांनी मयुरेश्वराचे दर्शन घेतल्याची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक राजेंद्र जगताप यांनी दिली. अंगारक चतुर्थीनिमित्ताने पहाटे गुरव मंडळींची प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य गाभारा सर्व भक्तांना दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळी सात वाजता सालकरी ढेरे यांनी श्रींची पूजा केली. या वर्षातील ही पहिलीच अंगारक असल्याने पहाटेपासूनच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, ठाणे अशा विविध भागातून गणेश भक्त दर्शनासाठी आले होते. दुपारी बारा वाजता ट्रस्टच्या वतीने महापूजा करण्यात आली. भक्तांसाठी 100 किलो खिचडीचा महाप्रसादचे मोफत वाटप करण्यात आले. भक्तांसाठी देवस्थानच्याा वतीने दर्शन रांग, पिण्याची पाणी, सुरक्षारक्षक, अतिरिक्त पोलीस मित्र, सफाई कामगार आदींनी जय्यत तयारी केली होती. दिवसभर ऊन, सावलीचा खेळ सुरू असूनही असंख्य गणेश भक्त दर्शन रांगेतून दर्शन घेत होते. देवस्थानने नव्याने सुरू केलेल्या व्हीआयपी दर्शन सुविधाचा लाभ भाविक घेत होते. यावर्षातील ही पहिली अंगारक चतुर्थी असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी आले होते. दिवसभर गर्दीचा ओघ सुरूच होता. सायंकाळी सहाच्या दरम्यान गर्दी आणखी वाढत गेली. बाजारपेठेतील पेढेतील दुकाने हार, दुर्वा, पेढे, श्रींच्या प्रतिमांनी सजवली होती. मोरगावला यात्रेचे स्वरूप आले होते. पेठेतील दुकाने, हॉटेल, पार्किंग, खेळणी दुकाने, चहा स्टॉल भाविकांनी भरगच्च भरली होती. सुूपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. रात्री चंद्रोदयाच्या वेळी महानैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी आरतीप्रसंगी शेकडो भाविक उपस्थित होते.