पुणे जिल्हा | प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढल्याप्रकरणी मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल

वाघोली, (प्रतिनिधी) – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाल्यानंतर सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाल्यानंतर वाघोलीतही मराठा बांधवांनी आक्रमक भूमिका घेऊन सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून घोषणाबाजी केली. याप्रकरणी वाघोलीतील मराठा बांधवांवर लोणीकंद पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
शनी शिंगारे, योगेश बरडे, ओंकार तुपे, ज्योती सातव व इतर 35 ते 40 मराठा बांधवांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शिपाई शंकर क्षीरसागर यांनी फिर्याद दिली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल होत असतानाचा मनोज जरांगे पाटील आक्रमक झाल्याने ते आंदोलनास्थळावरून मुंबईमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले होते.
त्यानंतर वाघोली येथील मराठा बांधव देखील आक्रमक झाल्यानंतर वाघोली गावठाण येथे रविवारी (दि. 25) सायंकाळी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. वाघोली येथील पाचारणे समाज मंदिरासमोर जमाव जमवून घोषणाबाजी करीत असताना पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून घोषणाबाजी सुरु ठेवून प्रतीकात्मक प्रेताचे, पुढार्यांचे चित्राचे प्रदर्शन करून राज्य सरकार उलथवून देण्यास प्रवृत्त केले.
तसेच वाघोली गावठाणामध्ये लाऊडस्पीकर द्वारे निषेधाच्या घोषणा देत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढल्याप्रकरणी मराठा बांधवांवर भादवी कलम 143, महाराष्ट्र पोलीस कायदा 37 (1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





