Pune District: शिरूर नगरपरिषदेला दणका

शिरूर : शिरूर नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनातील वायुप्रदूषण व गंभीर त्रुटींवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता कडक भूमिका घेतली आहे. शहरातील वायू प्रदूषणाच्या वाढत्या तक्रारींमुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नगरपरिषदेवर कठोर निर्देश जारी केले. १५ दिवसांत उपाययोजना न केल्यास कायदेशीर कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे शिरूर तालुका संघटक अविनाश घोगरे, मनसेचे शहराध्यक्ष आदित्य मैड व मनसेचे सचिव रवि लेंडे यांनी (दि.२७) जानेवारी रोजी MSW (म्युनिसिपल सॉलिड वेस्ट) साइटवरील प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवल्या.
त्यानंतर तक्रारीची व प्रभातच्या वृत्ताची दखल घेत (दि.२८) जानेवारी रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणेच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली असता अनेक गंभीर बाबी समोर आल्या. त्यामध्ये कचऱ्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन नाही. अवैज्ञानिक पद्धतीने कचरा टाकला जात आहे. काही ठिकाणी घनकचऱ्याचे जाळणे सुरूच आहे. वायू प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तर नगरपरिषदेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची अंतिम संधी…
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी १५ दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत नगरपरिषदेकडून योग्य घनकचरा व्यवस्थापन प्रणाली राबवली नाही तर पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ आणि हवेचे प्रदूषण प्रतिबंधक कायदा १९८१ अंतर्गत कडक कारवाई केली जाईल. असा इशारा दिला आहे. शिरूर नगरपरिषदेने वेळीच सुधारणा करावी, अन्यथा मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने नगरपरिषदेला दिला आहे.





