चुरशीने मतदान : उद्या फैसला होणार बारामती – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत चौरंगी लढतीत २१ जागांसाठी रविवार (दि.२२) चुरशीने मतदान झाले. ३७ गावांतील ६७ मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सहा गटांत ८८. ४८ टक्के मतदान झाले. ब वर्गात ९९.०२ टक्के मतदान झाले आहे. ९० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. माळेगाव कारखान्यात अ गटात १९ हजार ५४९ मतदार आहेत. तर ब गटात १०२ मतदार आहेत. त्यापैकी अ गटात १७ हजार २९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर ब गटात १०१ मतदारांनी हक्क बजावला. माळेगावच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री नीलकंठेश्वर पॅनेल, चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरू-शिष्यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बळीराजा सहकार बचाव पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समितीचा पॅनल व इतर अपक्ष, असे एकूण ९० उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. माळेगाव ,पणदरे, सांगवी ,खांडज, नीरावागज, बारामती या सहा गटांत सकाळपासून चुरशीने मतदान झाले. मंगळवार (दि.२४) रोजी सकाळी बारामती येथील प्रशासकीय भवन येथे होणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गट हा तिसऱ्यांदा अजित पवार यांच्या विरोधात निवडणुकीला सामोरे जात आहे. चौरंगी लढतीत एकसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मत टक्केवारीत विभाजन होणार असल्याने हा फटका कोणाला बसणार, याची उत्सुकता लागली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी ब गटातून उमेदवारी लढविल्याने ही निवडणूक राज्यात चर्चेत आली आहे. या निवडणुकीत अर्थकारण जोरात झाल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री पवार यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यावेळी जात फॅक्टर ऐरणीवर आल्याचे प्रचारात दिसून आले. तसेच क्रॉस व्होटिंगचा फटका कोणाला बसणार, याची उत्सुकता लागली आहे. कारखाना कार्यक्षेत्रात मराठा व धनगर समाजाचे प्राबल्य असून ऊस उत्पादक कोणाला झुकते माप देणार, कोणाला डावलणार, याकडे लक्ष लागले आहे.