सोमेश्वरनगर – विधानसभा निवडणुका असल्याने राज्यभरातील जवळपास निम्म्याहून अधिक ऊस कामगार कारखाना कार्यक्षेत्रात दाखल झाले नव्हते. कारखान्याने गाळपाचा पन्नास हजाराचा टप्पा ओलांडला आहे. सोमेश्वरने चालू हंगामात १३ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याने आजअखेर ९.४१ चा सरासरी साखर उतारा राखत ६७ हजार टन ऊस गाळप करत ५९ हजार क्विंटल साखरेचे उत्पन्न घेतले आहे. निवडणुका पार पडल्यानंतर ऊसतोड करणारी संपूर्ण यंत्रणा कारखाना कार्यक्षेत्रात दाखल झाल्या आहेत. उपलब्ध झालेल्या यंत्रणेवरच दहा दिवसांपासून हंगाम सुरू होता. मात्र, संपूर्ण यंत्रणा दाखल झाल्यानंतर सोमेश्वर कारखान्याच्या गाळप हंगामाने वेग घेतला आहे. ऊसतोडणी सुरू झाल्याने वाहने कारखाना कार्यस्थळावर दाखल होत आहेत. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम दि. १५ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. सुरुवातीला कारखान्याने करारबद्ध केलेली ७० टक्के यंत्रणा कारखाना परिसरात दाखल झाली होती. सुरुवातीला सभासदांच्या ऊस गाळपास प्राधान्य देण्यात येत आहे. दोन महिन्यानंतर गेटकेन ऊस गाळपास आणला जाणार आहे. ११५० बैलगाडी, ३८० ट्रक -ट्रॅक्टर, २६० डंपिंग आणि २० हार्वेस्टर अशी यंत्रणा गाळपास करारबद्ध केली आहेत. पंधरा दिवस हंगाम उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. दुबार पिकांसाठी शेतकरी मुकणार एक नोव्हेंबरला हंगाम सुरू झाला असता तर आत्तापर्यंत राज्यातील सर्वच कारखान्याचे एक लाखांहून अधिक गाळप पूर्ण झाले असते. उशिरा हंगाम सुरू झाल्याने दि. २० एप्रिलपर्यंत हंगाम लांबण्याची शक्यता आहे. कारखाना कार्यक्षेत्रात हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने आणि हंगाम उशिरा सुरू झाल्याने टनेजमध्ये घट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. याशिवाय दुबार पिके घेता येणार नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.