पुणे जिल्हा : खडकी येथे मुक्तादेवी यात्रेनिमित्त 610 बैलगाड्यांचा सहभाग

मंचर – मुक्तादेवी यात्रा उत्सवानिमित्त खडकी येथे चार दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीत तब्बल 610 बैलगाड्यांनी सहभाग घेतला. सतत तीन वर्ष प्रथम क्रमांकात विजयी झालेले 48 बैलगाडे दुपारी घाटातून धावले. सायंकाळी प्रथम क्रमांकातील विजेत्या बैलगाड्यांची फायनल शर्यत पार पडली. ती पाहण्यासाठी बैलगाडा शौकिनांनी एकच गर्दी केली होती.
मुक्तादेवी यात्रा उत्सवानिमित्त खडकी येथील प्रसिद्ध बैलगाडा घाटात तब्बल चार दिवस बैलगाडा शर्यत पार पडली. 610 बैलगाडे घाटातून धावले. चार दिवसांत प्रथम क्रमांक अरुण राजेंद्र पानमंद चांडोह, बाबुराव गेनुजी ढोबळे पारगाव, नारायण नबाजी जरे जरेवाडी, शिवांशराजे प्रतीक थोरात भक्ते मंचर यांचे बैलगाडे फळीफोड ठरले. तर द्वितीय क्रमांकात रविकांत शिवाजी बांगर पिंपळगाव, रोहन सुनील भालेराव कळंब, नित्या स्वप्नील गुंजाळ पिंपरखेड,
नयनदादा दीपक वळसे निरगुडसर यांचे बैलगाडे फळीफोड ठरले. तृतीय क्रमांकात विष्णू धोंडीभाऊ मोढवे साकोरे, सागर ग्रुप वैष्णवधाम, राजेंद्र टाकळकर चांदुस, महादू तावजी शिंदे यांचे बैलगाडे फळीफोड ठरले. घाटाचा राजा हा किताब देहुगाव येथील सहादूमामा मारुती काळोखे, भगवान बाबुराव गावडे गावडेवाडी, धनेश मुरलीधर टेमकर अवसरी, कार्तिकराजे अक्षय बांगर खडकी यांच्या बैलगाड्यांनी मिळवला. प्रथम क्रमांकातील विजेत्या बैलगाड्यांची फायनल शर्यत झाली.
त्यामध्ये पहिल्या दिवशी प्रथम सहादूमामा मारुती काळोखे, राजुशेठ वसंतराव जवळेकर, गेनभाऊ बाबुराव आल्हाट, दुसर्या दिवशी शिवकुमार कावडे, प्रदीप आप्पा टिंगरे व भगवान बाबुराव गावडे यांचे बैलगाडे विजेते ठरले. तिसर्या दिवशी धनेश मुरलीधर टेमकर, देवदत्त जयवंत निकम, तुषार सूर्यकांत मुटके तर चौथ्या दिवशी गणेश पोपट पवार, नारायण विठ्ठल मोरे, दिलीपराव वळसे पाटील, यशवर्धन विकास वाडेकर यांचे बैलगाडे विजेते ठरले.
भीमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर, सरपंच दत्तात्रय बांगर तसेच ग्रामस्थांनी यात्रेची व्यवस्था पाहिली. विजेत्या बैलगाड्या मालकांना रोख रक्कम तसेच मोटरसायकली बक्षीस देण्यात आले. चार दिवस बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी शौकिनांनी एकच गर्दी केली होती.





