निवडीपूर्वीच अजित पवार ॲक्शन मोडवर माळेगाव – माळेगाव कारखाना कार्यस्थळावर ऊस उत्पादन वाढीकरीता कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय) तंत्रज्ञान वापर करणेबाबत चर्चासत्र व प्रात्याक्षिक झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार कारखाना कार्यस्थळावर संचालकांसमवेत कृषी विज्ञान केंद्र शारदानगर येथील तज्ज्ञांचे मार्गदर्शनाखाली झालेल्या चर्चासत्रानुसार ऊस लागण हंगाम २०२५- २०२६ करिता कार्यक्षेत्रामधील प्राथमिक ५०० सभासदांकरीता ऊस पिकास कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय) तंत्रज्ञान राबविण्याचे ठरले आहे. कृषी विज्ञान केंद्र शारदानगर यांनी प्रायोगिक तत्वावर ऊस लागण हंगामामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करुन वेगवेगळ्या ऊस जातीची लागवड केली होती. त्यानुसार ऊस उत्पादनामध्ये ३० टक्क्यापर्यंत वाढ, ऊस उत्पादन खर्चामध्ये ३० टक्के बचत तसेच ४० टक्के पाण्याची बचत होण्यास मदत झाल्याचे निष्कर्ष मिळाले आहेत. तंत्रज्ञान वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बुद्रुक साखर संघ व कारखाना यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करुन कारखाना कार्यक्षेत्रामध्ये ही योजना राबविणेचे ठरविले आहे. योजना प्राधान्याने सहभाग घेणाऱ्या प्राथमिक ५०० सभासदांकरिता राबविण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाचा प्रती हेक्टरपर्यंत करीता खर्च रुपये २५ हजार रुपये असून त्यापैकी सहभागी सभासदाने रुपये ९ हजार रूपये भरावयाचे आहेत. सभासदाच्या वतीने कारखान्यामार्फत रुपये ६७५० रुपये जमा केले जाणार असून उर्वरित ९२५० रुपये वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट, मांजरी संस्थेमार्फत दिले जाणार आहेत. चर्चासत्राकरिता माळेगाव कारखान्याचे विद्यमान चेअरमन केशवराव जगताप, व्हाईस चेअरमन राजेंद्र ढवाण, आजी माजी संचालक मंडळ, कार्यकारी संचालक अशोक पाटील, मुख्य शेतकी अधिकारी धनंजय लिंबोरे, मुख्य ऊस विकास अधिकारी सुरेश काळे व कारखान्याचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. विद्यमान चेअरमन केशवराव जगताप यांनी कारखान्याची वाढलेली गाळप क्षमता तसेच मर्यादित कार्यक्षेत्र याचा विचार करुन या तंत्रज्ञानाच्या वापराने कारखाना ऊस उपलब्धतेबाबत स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे, असे सांगितले. संभाव्य रोग व किडींवर वेळेत नियंत्रण होणार कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा कार्यक्षेत्रात वापर करुन ऊस उत्पादन वाढीकरीता संचालक मंडळाचे समवेत कृषि विज्ञान केंद्र शारदानगरचे तज्ज्ञ संतोष करंजे व तुषार जाधव यांनी प्रात्याक्षिक सादर करुन मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने वेदर स्टेशनचा वापर, वाऱ्याची दिशा व वेग तसेच वातावरणातील तापमान, पर्जन्यमानाची मिळणारी पूर्वसूचना यामुळे उसावरील संभाव्य रोग व किडींचा प्रादुर्भाव यांचे वेळेत नियंत्रण करणे सुलभ होणार आहे. सॉईल सेन्सॉरमार्फत जमीनीतील आर्द्रतेची माहिती घेऊन पाण्याचे नियोजन त्याचबरोबर न्युट्रीयंन्ट सेन्सरचा वापर करुन जमीनीतील नत्र, स्फुरद, पालाश व सुक्ष्म अन्न द्रव्य यांची ऊस पिकाकरिता आवश्यक मात्रा समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे खर्चामध्ये बचत होऊन उत्पादन वाढ होण्यास मदत होणार आहे.