Pune District : ३५ कातकरी समाजबांधवांना मिळाले हक्काचे घर

वडगाव डाळ येथे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत गृह प्रवेश
भोर – वडगाव डाळ (ता. भोर) येथे प्रधानमंत्री जनमन घरकुल आवास योजनेंतर्गत कातकरी समाजाच्या ३५ नागरिकांना स्वत:च्या हक्काचे घर मिळाले. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या उपस्थितीत गृहप्रवेश करण्यात आला.
ग्रामपंचायत वडगाव डाळ येथील गरीब वंचित आदिवासी कातकरी जमातीच्या ३५ लाभार्थ्यांचे पी.एम.जनमन घरकुल आवास योजनेंतर्गत घरकुलांचे एकाच ठिकाणी काम करण्यात आले आहे. याची पाहणी बुधवारी (दि.९) मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केली. तसेच यादरम्यान घरकुलांचा गृहप्रवेशाचा शुभारंभ पाटील यांनी केला.
यावेळी आशा नथु पवार, रेखा मंगेश वाघमारे या २ लाभार्थांच्या घरकुलाचे गृहप्रवेश मुख्य पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे, विस्तार अधिकारी माणिक घोगरे, ग्रामपंचायत अधिकारी परमेश्वर खटके, सरपंच नवनाथ चौधरी, उपसरपंच शुभम उल्हाळकर ग्रा.प.सदस्य सुधीर खोपडे, संदीप गायकवाड, वंदना चौधरी, रुपाली बरदाडे उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री जनमन घरकुल योजनेच्या माध्यमातून आदिवासी कातकरी समाजाच्या लोकांना स्वतःचे घर मिळाले असून गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी लाभार्थाना मदत मिळवून देऊन अत्यंत चांगली घरकुले बांधली असल्याने याचे मला कौतुक आहे. सदर कातकरी समाजाची घरकुले शासनाने दिलेल्या पैशात पूर्ण होत नसल्यामुळे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी पत्रे, रंगरंगोटी, खिडक्या, दरवाजे यासाठी आर्थिक मदत मिळवून दिल्याने घरकूल लवकर होण्यासाठी मदत झाल्याचे लाभार्थांनी सांगितले.





