ज्येष्ठ नेत्यांची उघडपणे नाराजी; १२५- ४० जागांचा फॉर्म्युला पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील उमेदवारही अजित पवार यांनीच ठरवल्याचा आरोप करत ज्येष्ठ नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. या नाराजी नाट्यामुळे दोन्ही पक्षांतील अंतर्गत कलह अर्ज दाखल करताना आणि एबी फाॅर्मचे वाटप करताना बाहेर आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या नेत्यांनी धावपळ करत ६० ते ७० जणांना एबी फाॅर्म दिला. जागांची वाटणी ठरली असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १४० पेक्षा जास्त जणांना उमेदवारी अर्ज दिल्याचा दावा यादरम्यान करण्यात आला. दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जागा वाटप, चिन्हावरून बरीच खलबते होऊन अखेर सोमवारी फाॅर्म्युला ठरला. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने १२५ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाने ४० जागा लढण्याचे निश्चित झाले. दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पवार यांच्याकडून उमेदवारी अर्ज देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जात होता. मात्र, भाजपसह अन्य पक्षांमधील नाराजांची रीघ बंगल्याबाहेर लागली. त्यातील बहुतेकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. निष्ठावंतांनी मात्र एबी फॉर्म न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून १२५ हून अधिक जणांना उमेदवारी अर्ज देण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, नेत्यांकडून त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती, कार्यकर्त्यांना तिकीट देण्याची मागणी पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडे केली जात होती. त्यांचीही उमेदवारी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडूनच निश्चित केली जात होती. इच्छुकांना पवार यांच्याकडून उमेदवारीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. पक्षाच्या नेत्यांनाही उमेदवारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची चर्चा सुरू होती. पक्षातील इच्छुक उमेदवार एबी फॉर्म मिळण्याच्या अपेक्षेने निवडणूक कार्यालयाबाहेर थांबले होते. अर्ज भरण्यास शेवटचे एक-दोन तास शिल्लक असतानाही पक्षाने त्यांची दखल घेतली नसल्याचा आरोप उमेदवारांनी केला. नेत्यांची धावपळ अखेर संतप्त कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. हा प्रकार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर पक्षाचे नेते अंकुश काकडे यांच्याकडून आपल्या पक्षाच्या ६० ते ७० उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. काहींनी एबी अर्ज स्वीकारून तत्काळ आपले अर्ज दाखल केले, तर काही उमेदवारांनी अर्ज घेण्यास नकार दिला. या नाराजांना शांत करण्यात वरिष्ठ नेत्यांना नाकीनऊ आले.