पुणे – गेली चार वर्षे निधी, भूसंपादन आणि मान्यतांच्या फेऱ्यात अडकलेल्या सनसिटी ते कर्वेनगरला जोडणाऱ्या उड्डाणपुलाची निविदा महापालिकेने काढली. त्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करून भूमिपूजनाची तारीखही निश्चित झाली. मात्र, पुलाचे काम करणारी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने महापालिकेने विधी विभागाचा सल्ला घेऊन या पूलाची निविदा रद्द केली आहे. तर, दुसऱ्या बाजूला महापालिकेने नवशा मारुती परिसर ते डीपी रस्ता असा नवीन नदीपुलावरील उड्डाणपूल प्रस्तावित केला असून या प्रस्तावास स्थानिक नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे. या पुलाविरोधात कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून प्रस्तावित केलेल्या या दोन्ही पर्याय अडचणीत आले आहेत. त्यामुळे, सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कशी फुटणार आणि हे अडचणींचे दृष्टचक्र कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सनसिटी- कर्वेनगर पूल लांबणीवर पडणार सिंहगड रस्त्याला पर्याय ठरू शकणारा रस्ता म्हणून महापालिकेकडून सनसिटी ते कर्वेनगर असा नदीवर उड्डाणपूल प्रस्तावित केला होता. त्यासाठी 10 गुंठे पेक्षाही कमी भूसंपादन करावे लागणार होते. मात्र, सलग दोन वर्षे अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद उपलब्ध न झाल्याने तसेच जागा ताब्यात नसल्याने या पूलाची निविदा रखडली. तर, नंतर जवळपास सहा महिने निविदांच्या दरांमधे गेले. त्यानंतर पालिकेने या पुलाची निविदा मंजूर करून कार्यादेश दिले. मात्र, त्याच वेळी संबधित काम देण्यात आलेली कंपनी दिवाळखोरीत निघाली. परिणामी, महापालिकेकडून कायदेशीर बाबी तपासून हे काम देण्यात आलेल्या कंपनीचे काम काढून घेतले आहे. त्यामुळे या पुलासाठी पुन्हा निविदा काढल्या जाणार आहेत. त्यास आणखी तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाईल त्यातच महापालिका, लोकसभा निवडणुका लागल्या तर हा पूल आणखी लांबणीवर जाणार आहे. सरिता नगरी ते डीपी रस्ता पुलाविरोधात कृती समिती शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासनाने सिंहगड रस्त्यावरील नवश्या मारुतीच्या मागील बाजूने सरितानगरी ते डीपी रस्त्यावर नदीवर पूल प्रस्तावित केला असून, त्यासाठी सल्लागार नेमण्याची निविदा काढली आहे. मात्र, पुलास स्थानिक नागरिकांकडूनही विरोध सुरू झाला आहे. या पुलाविरोधात कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकेने हा पूल रद्द करावा, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशाराही समितीकडून देण्यात आला आहे. दरम्यान, हा पूल झाल्यास कोथरूड तसेच कर्वेनगरमधून येणाऱ्या वाहनांना स्वारगेटकडे जाण्यासाठी राजराम पुलावरून पुन्हा सिंहगड रस्त्याला यावे लावणार नाही. ही वाहने थेट डीपी रस्त्यावरून नवशा मारुती समोरून स्वारगेटकडे जाऊ शकतील. कोथरूड कडून येणारी वाहने सध्या म्हात्रेपूल आणि दांडेकर पुलाकडून स्वारगेटकडे जातात. त्यांनाही नवा पर्याय मिळणार आहे. मात्र, या पुलास स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याने महापालिका त्याबाबत काय निर्णय घेते, सिंहगड रस्त्याला आणखी एक वाहतूक पर्याय मिळणार का, हे ठरणार आहे. दरम्यान, याबाबत प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले.