पुणे – जिल्ह्यातील स्टोन क्रशरचालकांनी मागण्यांसाठी बेमुदत बंद पुकारल्याने जी-20 परिषदेच्या तोंडावर महापालिकेकडून शहरात करण्यात येणारी विकासकामे, मेट्रोसह, नदीसुधार योजना, रस्ते दुरुस्ती ठप्प झाली आहे. त्यामुळे जी-20 परिषदेपूर्वी महापालिकेकडून शहरात केल्या जाणाऱ्या विकासकामांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असून, हा संप न मिटल्यास प्रशासनाच्या अडचणीत वाढ होणार आहे. पुणे जिह्यात जिल्हा खाण व क्रशर संघटनेचे सुमारे 500 सदस्य असून, जिल्ह्यातील एकही खाण सध्या सुरू नाही. दम्यान, या प्रकरणाचा तिढा सोडविण्यासाठी शासकीय यंत्रणाकडून राज्य शासनास साकडे घालण्यात आले असून, लवकरच त्यावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जाते. चुकीच्या काम करणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित असताना सर्वांवर कारवाई केली जाते. हे बंद करावे तसेच गुजरात सरकारच्या धर्तीवर राज्यातही “वन विंडो’ धोरणाची अमंलबाजवणी करावी, अशा क्रशरचालकांच्या प्रमुख मागण्या आहेत. रस्ते दुरुस्ती, जी-20च्या कामांना ब्रेक शहरात जानेवारी महिन्यात जी-20 परिषद होणार आहे. त्या अनुषंगाने महापालिकेकडून शहरात खासगी सहभागातून 60 चौकांचे सुशोभीकरण केले जाणार असून, काही प्रमुख रस्तेही दुरुस्त केले जाणार आहेत. या सर्व कामांसाठी प्रशासनाने 25 डिसेंबर 2022 पर्यंतची मुदत निश्चित केली होती. मात्र गेल्या आठ दिवसांपासून क्रशर बंद असल्याने ही कामे जवळपास ठप्प आहेत. या कामांसाठी मोठ्या प्रमाणात खडी, वाळू, मुरूम तसेच सॅन्ड क्रश लागत आहे. मात्र, ते मिळत नसल्याने ही कामे तशीच थांबविली आहेत. तर पालिकेची विकासकामे करणाऱ्या काही ठेकेदारांकडे खडी, वाळूचा साठा असून, तो उपलब्ध करून तातडीची कामे केली जात आहेत. मेट्रोचीही कामे ठप्प शहरातील वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मार्गाची 85 टक्के कामे पूर्ण झालेली असून, उर्वरित कामे वेगाने सुरू आहेत. त्यासाठी महामेट्रोला मोठ्या प्रमाणात वाळू, खडी तसेच गरज पडल्यास मुरूमाची आवश्यकता आहे. मात्र, आठ दिवसांपासून क्रशर बंद असल्याने मेट्रोच्या कामाचा वेग मंदावला असून, प्रकल्पाच्या वेळापत्रकावर तसेच खर्चावरही परिणाम होत आहे. त्यामुळे महामेट्रोकडूनही शासनास याबाबत कळविले जाणार असून, तोडगा काढण्याची मागणी केली जाणार आहे. बांधकाम व्यावसायिक हवालदिल खडी आणि वाळू मिळत नसल्याने बांधकाम व्यावसायिकही हवालदिल झाले आहेत. शहरात आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन बांधकामे तसेच टाऊनशिपची कामे सुरू आहेत. सुरुवातीला कामाच्या ठिकाणी असलेल्या या साहित्याचा साठा वापरून कामे सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, आता बंदमुळे प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. याशिवाय, हॉटमिक्स प्रकल्पही बंद पडले असून, बांधकाम व्यावसायिकांनाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.