समाजकंटकाचे कृत्य; नगरसेविका उज्वला जंगले यांची तक्रार
हडपसर – काळेपडळ साईचौक येथील सुशोभीकरणासाठी कारंजे उभारण्यात आले होते. पण, अज्ञात समाजकंटकाने त्याची तोडफोड केली. शनिवारी दुपारी हा प्रकार घडला. याबाबत भाजपच्या नगरसेविका उज्वला जंगले यांनी हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे. या तोडफोडीची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
काळेपडळ साईचौक येथे अतिक्रमण होऊ नये, यासाठी नगरसेविका उज्वला जंगले यांनी सुमारे साडेचार लाख रुपये खर्च करून सुशोभीकरण हे कारंजे उभारले होते. मात्र, शनिवारी दुपारी या कारंजांची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याचे समोर आले. याबाबत स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी तोडफोडीचा निषेध केला.
याबाबत जंगले यांनी सांगितले, “या परिसरात विविध विकास कामे करण्यात आली आहेत. यात सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते, चौकांचे सुशोभीकरण केले आहे. येथील कारंजे सुस्थितीत सुरू होते. याबाबत चांगली चर्चा होत होती. मात्र, कोणीतरी समाज कंटाकाने हे कृत्य केले असावे, याघटनेचा निषेध केला आहे.या तोडफोडीची चौकशी करून समाज कंटाकावर कारवाई करण्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दिली आहे.’