कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका पुणे- नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये लोकशाहीची पायमल्लीची झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत असून आता निवडणूक आयोग कठपुतळी बनल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांशी बोलताना केली. पालिकांच्या निवडणुकांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला आहे. प्रशासकीय आणि मतदारांचा गोंधळ निवडणुकीत पहायला मिळाली. ४० तास आधी मतदान पुढे ढकलणे अनाकलनीय आहे. मतमोजणी पुढे ढकलल्याने निवडणूक आयोगाचे वाभाडे निघाले आहेत. निवडणूक आयोग मूलभुत कर्तव्य बजाविण्यात कमी पडले आहे. ज्या अधिकाऱ्यांनी चुका केल्या, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही सपकाळ यांनी केली. पालिकेच्या निवडणुकीबाबत राज्यात २५ हजार तक्रारी आल्या असाव्यात. सत्ताधारी आता निवडून येणारे उमेदवारही फोडण्याची शक्यता आहे. भष्ट्राचारामुळे भाजप गब्बर झाली आहे. सगळ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. पैसा फेक तमाशा देख, असे चित्र आहे. भाजपने काँग्रेस पक्ष संपवण्यासाठी काँग्रेस मुक्त भारत घोषणा केली होती. आता भाजपने त्यांच्या स्टेजवर जरी पाहिले तरी भाजप काँग्रेस युक्त झाली आहे, अशी अवस्था आहे, असा टोलाही सपकाळ यांनी लगाविला. काँग्रेस राज्यभरात १६० जागी नगराध्यक्ष पदासाठी लढत आहे. प्रचारासाठी काँग्रेसचे सर्व नेते फिरले असून ठिकठिकाणी सभाही झाल्याचे त्यांनी सांगितले.