Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

पुणे : वातावरणातील उष्णतेमुळे आंब्याासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने राज्यासह परराज्यातून आंब्यांची आवक वाढली आहे. परिणामी गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात मोठ्या प्रमाणात आंबा दिसू लागला आहे. आंब्याचे दरही मोठ्या प्रमाणात खाली आल्याने खरेदीदारांकडून आंब्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. परिणामी, अन्य फळांच्या खरेदीकडे खरेदीदारांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
शेतकरी वर्गाकडून लहान, तसेच कच्च्या लिंबाची तोड करून बाजारात व्रिक्रीस पाठविण्याचा धडाका कायम आहे. लिबांमध्ये अपेक्षित रस नसल्याने, तसेच ती कच्ची असल्याने लिंबाच्या भावात 15 ते 20 किलोच्या गोणीमागे शंभऱ रुपयांनी घसरण झाली आहे. याखेरीज, डाळिंब व खरबूजच्या भावातही मागणीअभावी दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. बाजारात बहुतांश फळांची आवक जावक कायम असून, दर गत आठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत.
गुलटेकडी येथील मार्केट यार्ड फळबाजारात रविवारी (दि. 18) फळबाजारात मोसंबी 25 ते 30 टन, संत्री 1 ते 2 टन, डाळिंब 20 ते 25 टन, पपई 20 ते 25 टेम्पो, लिंबांची सुमारे 2 हजार गोणी, कलिंगड 20 ते 25 टेम्पो, खरबूज 15 ते 20 टेम्पो, चिकू दोन हजार बॉक्स, पेरू 150 ते 200 क्रेटस्, अननस 6 ट्रक, रत्नागिरी हापूसची पेटी, तर कर्नाटक आंब्याची दोन ते तीन हजार बॉक्स इतकी आवक झाली होती.
रत्नागिरी हापूसच्या डझनास ३०० ते ६०० रुपये मोजावे लागत आहेत. (4 ते 9 डझन पेटी) कच्च्या मालास 1500-4000, तर तयार मालास 2000-4500 भाव मिळत आहे. कर्नाटक हापूस (3 ते 5 डझन) कच्च्या पेटीस 1000-1600 रुपये भाव मिळत आहे.





