प्रवाशांचा विमानतळावर गोंधळ पुणे – पुणे-दिल्ली विमानसेवेला उशीर होणे हे वारंवार घडत असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवारी (दि. १८) पहाटे पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला तीन तास उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना ताटकळावे लागले. विलंबाचे कारण प्रवाशांना सांगितले नसल्याने ते वैतागले होते. विमान पहाटे एक विमान पाच वाजून पाच मिनिटांनी दिल्लीसाठी उड्डाण करणार होते. त्यासाठी दोन ते तीन तास अगोदर प्रवासी विमानतळावर आले होते. मात्र, वेळ उलटून गेली तरी विमानाने काही उड्डाण केले नाही. प्रवाशांना विमान कधी सुटणार हे सांगितले जात नव्हते. बरेच प्रवासी कामाच्या निमित्ताने पहाटेच्या विमानाने निघाले होते. विमान वेळेत सुटत नसल्यामुळे त्यांचे पुढील काम व नियोजन बिघडणार होते. काहीही माहिती दिली जात नसल्यामुळे शेवटी प्रवाशांनी आरडा-ओरडा करून अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरूवात केली. शेवटी पहाटे पाचचे विमान सकाळी आठ वाजून १७ मिनिटांनी सुटले. ते दिल्लीला सव्वा दहा वाजता पोहोचले.