पुणे : ‘कल्व्हर्ट’च्या बांधकामाला झालेल्या विलंबामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये पूर आल्याची तक्रार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) च्या वतीने मुख्य पुलाच्या बांधकामास झालेल्या विलंबामुळे हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्कमध्ये जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही सात जून रोजी पाणी साचले होते. याबाबत एमआयडीसीकडे वारंवार पाठपुरावा केला परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे पीएमआरडीएचे म्हणणे आहे. आजूबाजूच्या टेकड्यांमधून पाणी मोठ्या प्रमाणात हिंजवडीमध्ये येते. एमआयडीसीने मेट्रोच्या बांधकामादरम्यान पूर व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून येथे एक कल्व्हर्ट बांधणे आवश्यक होते. त्यासाठी वर्षभर पाठपुरावा करूनही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचे पीएमआरडीएचे मुख्य अधीक्षक अभियंता रिनाज पठाण म्हणाले. थोड्याशाच पावसाने हिंजवडी आयटी पार्कमध्ये रस्ते जलमय होऊन वाहतूक ठप्प तर झाली. त्याचबरोबर वाहनांचेसुद्धा नुकसान झाले. हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये ४०० हून अधिक आयटी कंपन्या आहेत. त्यांचेही नुकसान झाले. मेट्रो प्रकल्पातील मलबा, गाळ आणि बांधकाम कचऱ्याने नाले तुंबलेले आहेत. काही भागांत नाल्याचा भाग तुटलेला आहे. काहीभाग पूर्णपणे गायब आहेत. अनेकदा फेज १ मध्ये या महिन्यात आतापर्यंत फक्त २५.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे आणि टप्पा २ मध्ये फक्त १९.२ मिमी पाऊस पडला आहे; दोन्ही मिळून ४६.२ मि.मी.च्या मासिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तज्ज्ञांच्या मते इतक्या कमी पावसामुळेही पूरस्थिती निर्माण होत असेल ते चिंताजनक आहे. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांच्या समूहाने संपूर्ण आयटी पार्कमधील ड्रेनेज सिस्टीमचे संपूर्ण ऑडिट आणि साफसफाईची मागणी केली आहे. छोट्या पावसामुळे ही स्थिती निर्माण होत असेल आणि त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना होत नसेल तर कंपन्यांना रिमोट (वर्क फ्रॉम होम) कामाचा विचार करावा लागेल, अशी कर्मचाऱ्यांची मानसिकता झाली आहे.