Pune : रस्ता रूंदीकरणासाठी संरक्षण विभाग देणार जागा

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या शहराच्या पूर्व भागातील काही प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून संरक्षण विभागाकडे सुधारीत प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत, या रस्त्यांच्या रूंदीकरणाबाबत विभागीय आयुक्तांकडे नुकतीच महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीस महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, संरक्षण विभाग,पोलीस प्रशासन, संरक्षण विभागाचे अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.
शहरात गेल्या काही वर्षात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी वाढलेली आहे. त्यासाठी पालिकेकडून शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांचे रूंदीकरण केले जात आहे. मात्र, या रस्त्यांना जोडणारे अनेक पर्यायी रस्ते सरंक्षण विभागाच्या हद्दीतून जातात. हे रस्ते वाहतूकीसाठी खुले असले तरी त्यांचे डीपी, तसेच आरपी नुसार रस्त्यांचे रूंदीकरण प्रस्तावित आहे. प्रत्यक्षात रस्ते अरूंद आहेत, त्यामुळे या रस्त्यांवर गेल्या काही वर्षात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
ही बाब लक्षात घेऊन महापालिका आणि पोलिसांकडून या रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार, रस्ते रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रस्त्यांमध्ये नाॅर्थ मेन रस्ता (कल्याणी नगर पूल ते पिंगळे वस्ती), गोळीबार मैदान ते कोंढवा, लुल्लानगर (गंगाधाम चौक परिसर), घोरपडी रस्ता ते भैरोबानाला रस्ता, भैरोबा नाला ते नेताजी नगर रस्ता अशा रस्त्यांचा समावेश आहे.
या रस्त्यांच्या रूंदीकरणासाठी जागा मिळाव्यात अशी मागणी करणारे पत्र महापालिकेकडून संरक्षण विभागास देण्यात आले होते. मात्र, त्याबाबत संरक्षण विभागाकडून हालचाल झालेली नव्हती. त्यामुळे, महापालिकेकडून विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सर्व विभागांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी करण्यात आली होती.
त्यानुसार, सर्व विभागांनी एकत्र नियोजन करत या प्रकरणी सर्व विभागांनी शहरासाठी योग्य निर्णय घ्यावा अशा सूचना विभागीय आयुक्तांंनी केल्या आहेत. तसेच, संरक्षण विभागाच्या सूचनेनुसार महापालिकेने आवश्यक असलेल्या जागांबाबत सुधारीत प्रस्ताव दाखल करावेत, अशा सूचनाही या बैठकीत महापालिकेस देण्यात आल्या आहेत.





