Pune : प्राथमिक चौकशीत ‘दीनानाथ’ दोषी

पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरोदर मातेला उपचारासाठी दाखल करून न घेतल्याने तिचा मृत्यू झाल्याच्या प्रकाराची समितीमार्फत प्राथमिक चौकशी झाली असून, त्यात रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आले आहे. यामध्ये रुग्णालयावर कारवाई करण्याची शिफारस महापालिका आणि धर्मादाय आयुक्तांना केली आहे.
या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्यसेवा उपसंचालक, सहायक संचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि आरोग्यसेवा विभागाचे वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश असलेली समिती नेमली होती.
या समितीने प्राथमिक चौकशी करून अहवाल दिला आहे. यामध्ये रुग्णालयातील डॉक्टर किंवा कर्मचारी यांनी सदर रुग्ण धर्मादाय योजनेअंतर्गत पात्र असताना त्या योजनेतून दाखल करून घेतले नाही हे स्पष्ट होते. याबाबत तरतूद असूनही त्याचा भंग केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नियमानुसार सहायक धर्मादाय आयुक्त यांनी रुग्णालयावर कारवाई करावी. अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे.
रुग्णावर प्रथम गोल्डन अवर्स मध्ये उपचार करणे आणि त्यानंतर रुग्णाला सोयीच्या नजीकच्या रुग्णालयात पाठवणे अपेक्षित होते. परंतु तशी कार्यवाही झाली नाही. त्यामुळे रुग्णालयाने अॅक्टमधील तरतुदीचा भंग केला आहे. त्यामुळे नियमानुसार महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियमातील तरतुदी नुसार रुग्णालयावर कारवाई करण्याची शिफारस समितीने केली आहे.
रुग्णालयातील ग्रीव्हेन्स रिड्रेसल सिस्टीम, धर्मादाय कक्ष आणि जनसंपर्क अधिकारी (पब्लीक रिलेशन ऑफीसर) यांच्या मार्फत रुग्णाचे समुपदेशन करुन उपचारासाठी येणारा खर्च या बाबतची माहिती देऊन धर्मादाय योजने अंतर्गत दाखल करण्याबाबत समुपदेशन करणे अपेक्षित होते; परंतु तसे केले नसल्याचे दिसून येते, असे समितीच्या अहवालात म्हटले आहे.
याशिवाय हा मृत्यू हा माता मृत्यू असल्याने याबाबत सखोल चौकशी माता मृत्यू अन्वेषण समिती मार्फत करण्यात येत असून, त्याचा अहवाल आणि माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल यावरुन निष्कर्षासह अंतिम अहवाल तयार करण्यासाठी काही कालावधी लागणार असल्यामुळे तो लवकरच सादर करण्यात येईल, असेही अहवालात नमूद केले आहे.




