Pune : डेक्कन, शिवाजीनगरला मिळणार मुबलक पाणी

पुणे : डेक्कन आणि शिवाजीनगर गावठाणासह, माॅडेल काॅलनी आणि वडारवाडी परिसरातील पाण्याची समस्या कायमची सुटणार आहे. या भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून ८५ लाख लीटर क्षमतेच्या २ टाक्या तसेच ३० लाख लीटर क्षमतेच्या दोन टाक्या उभारण्यात येत आहेत.
त्यातील ८५ लाख लीटर क्षमतेच्या एका टाकीचे काम एप्रील अखेर पूर्ण होणार आहे. तर, या टाकीला पाणी पुरवठा करणाऱ्या ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे कामही महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण होण्यास दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे, जून २०२५ अखेर पर्यंत या भागात पुरेसे पाणी मिळण्यास सुरूवात होणार आहे. तर डिसेंबर २०२५ अखेर उर्वरीत सर्व टाक्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर या भागातील पाण्याची समस्या कायमची संपणार आहे.
असे आहे महापालिकेचे नियोजन
महापालिकेकडून डेक्कन , शिवाजीनगर परिसर, शिवाजीनगर गावठाण, माॅडेल काॅलनी, बीएससीसी महावविद्यालय रस्ता, पोलीस वसाहत, बीएमसीसी, वडारवाडी आणि गोखले नगरचा काही भाग, या भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी फर्ग्युसन टेकडीवर १ लाख ७० हजार लीटर क्षमतेची मोठी टाकी उभारली जात आहे. ही टाकी ८५ लाख लीटरचे दोन विभाग करून उभारली जात आहे. त्या शिवाय ३० लाख लीटर क्षमतेच्या आणखी दोन टाक्या उभारण्यात येत आहेत. या टाकीला वारजे जलककेंद्रामधून एसएनडीटी एचएलआर टाकीतून पाणी दिले जाणार आहे.
त्यासाठी, ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या जलवाहीनीचे बीएमसीसी महाविद्यालय रस्त्यावर काम केले जाणार आहे. मात्र, दहावी व बारावीच्या परिक्षा असल्याने पोलिसांनी या कामास परवानगी दिलेली नव्हती. ही परवानगी महापालिकेस नुकतीच मिळालेली असल्याने महापालिकेने सोमवार पासून हे काम सुरू केले आहे. त्यामुळे, दोन महिन्यात टाकीचे, तसेच जलवाहिनीचे काम पूर्ण करून त्याच्या चाचण्या झाल्यानंतर लगेचच या भागाचा पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार आहे.
अडथळयांवर महापालिकेची मात
या टाक्या उभारण्यासाठी महापालिकेने २०१८ मध्ये निविदा काढल्या होत्या. मात्र या टाक्या टेकडीवर असल्याने या टाक्यांना स्वयंसेवी संस्थानी विरोध करत एनजीटीमध्ये दोन वेळा तक्रार केली. दोन्ही वेळेस महापालिकेस दिलासा मिळाला, त्यातच, ही जागा वनविभागाची असल्याने आणि ती वेळेत न मिळाल्याने ठेकेदाराने काम करण्यास नकार दिला.
त्यामुळे महापालिकेस फेरनिविदा काढावी लागली. त्यानंतर पुन्हा करोना काळात काम रखडले. मात्र, त्यानंतर महापालिकेने प्राधान्याने हे काम हाती घेतल्याने ८५ लाख लीटरची टाकी आता तयार झाली असून, उर्वरीत टाक्यांची तसेच इतर कामे डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण झाल्यानंतर या भागातील पाण्याची समस्या कायमची संपणार आहे.





