Pune: वादविवाद तेव्हाच संपू शकतात जेव्हा त्याला राजकीय किनार नसते

पुणे : वादविवाद तेव्हा संपू शकतात ज्यावेळी त्याला राजकीय किनार नसते, ज्या वादाला राजकीय किनार असते, ते वाद कधीच संपू शकत नाहीत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिवरायांविषयी पॉडकास्टच्या माध्यमातून केलेल्या बदनामीच्या प्रकारावरून गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला गदारोळ, आणि अशा विषयात तज्ज्ञांची समिती नेमण्याविषयी विचारले असता, फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना हे उत्तर दिले.
यापूर्वी देखील अशा समित्या तयार केल्या होत्या आणि त्यावर सरकारने निर्णय देखील घेतले होते, असे सांगतानाच अपमानित करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवू. कोणी असे वागत असेल तर सरकार आणि शिवप्रेमी त्यांना माफ करणार नाहीत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा शिवाजी महाराजांनी दिला. फारशी भाषेतील शब्द वगळून मराठी भाषा वापरण्याची आज्ञावली शिवरायांनी दिली. छत्रपती होते म्हणून आम्ही आहोत. त्यांनी आम्हांला आत्माभिमान दिला, आत्मतेज दिले. त्यांनी आम्हांला समतेचा संदेश दिला, असे फडणवीस यांनी सांगितले.
संभाजी महाराजांचे शौर्य, वीरता आणि विद्वत्ता ही प्रचंड होती, पण इतिहासाने त्यांच्यावर खूप अन्याय केला. मी अद्याप चित्रपट पाहिला नाही, परंतु ज्यांनी पाहिला त्यांनी मला सांगितले आहे की, इतिहासाशी प्रतारणा न करता ऐतिहासिक सिनेमा तयार झाला आहे. त्यामुळे निर्माते, निर्देशक आणि कलाकारांचे अभिनंदन करतो. सन २०१७ मध्येच करमणूक कर काढून टाकला आहे, त्यामुळे तो प्रश्न येत नाही. परंतु संभाजी महाराजांचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काय काय करता येईल याचा प्रयत्न करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
अन्य नेते पुण्यातील कार्यक्रमात का आले नाही, याविषयी विचारले असता, आम्ही शिवनेरीहून एकत्र निघालो, परंतु प्रत्येकाचे नियोजित कार्यक्रम असल्याने ते त्या कार्यक्रमांना गेले. त्यामुळे एकत्रित कार्यक्रमांना उपस्थित न राहण्यामागे दुसरे काहीच कारण नाही, असे फडणवीस म्हणाले.





