पुणे – रेल्वे स्थानक आवारात बेवारस व्यक्‍तीचा मृत्यू

घटनेनंतरही मृतदेहाची हेळसांड झाल्याचा आरोप

पुणे – रेल्वे स्थानक आवारात आजारी असलेल्या बेवारस व्यक्तीची प्रशासनाने दखल न घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर, मृत्यू झाल्यानंतरही डॉक्‍टर आणि रेल्वे प्रशासनाकडून या व्यक्तीच्या मृतदेहाची हेळसांड झाल्याची खंत व्यक्‍त केली जात आहे. या प्रकाराबद्दल रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी माहिती दिली.

रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी प्रवेशद्वार क्रमांक तीनजवळ एका बेवारस व्यक्ती बराच वेळ पडून होती. ही व्यक्ती निपचित पडल्याचे शहा यांनी पाहिल्यानंतर तातडीने स्थानकातील वैद्यकीय कक्षात जाऊन मदतीची विनंती केली. पण, अधिकाऱ्यांनी जबाबदारी नाकारली. त्याचबरोबर स्थानकातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही याची कल्पना देण्यात आली. त्यांनीही मदतीस नकार दिला. तब्बल तीन ते चार धावपळ करून “जीआरपी’कडून मृतदेह उचलण्यात आला, अशी माहिती शहा यांनी दिली.

या पूर्वी देखील या आवारात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. “जीआरपी’ यंत्रणेकडे मृतदेह किंवा जखमींना रुग्णालयात पोहोचविण्याची जबाबदारी असते. त्यासाठी त्यांना निधी उपलब्ध करून देण्यात येतो. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून ही सर्व व्यवस्था “जीआरपी’कडे असते, असे सांगण्यात आले.

…किमान माणूसकी तरी दाखवा
माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना चुकीची आहे. रेल्वे प्रशासन, जीआरपी आदींनी अशा वेळी किमान माणूसकी दाखवणे गरजेचे आहे. रेल्वे प्रशासनाकडून असे मृतदेह उचलण्यासाठी हजारो रुपये देण्यात येतात. रेल्वे प्रशासनाने वेळीच हालचाल केली तर अशी परिस्थिती येणार नाही, याचा प्रशासनाने विचार करणे गरजेचे आहे. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत सहकार्य केले असते तर कदाचित या व्यक्तीचा जीव वाचण्याची शक्‍यता होती, असा दावा हर्षा शहा यांनी केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.