Pune : टेट परीक्षा अर्ज भरण्यासाठी १४ मे पर्यंत मुदतवाढ

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करण्यासाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (टेट) २०२५ या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १४ मे पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.
टेट परीक्षेचे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची १० मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता वाढविण्यात आलेली आहे. शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवार यांना देखील टेट परीक्षेस प्रविष्ठ होण्यास पात्र राहतील. मात्र ५ मे २०२५ पूर्वी अर्ज भरलेल्या उमेदवारांना सुधारित तरतूदीचा लाभ घ्यावयाचा असेल तर त्यांनी पुन्हा ऑनलाइन अर्ज भरावे लागतील. हे भरलेले ऑनलाईन अर्ज अंतिम समजून पहिले अर्ज रद्द करण्यात येणार आहेत.
टेट परीक्षा २४ मे ते ५ जून या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. बी.एड., एम. एड., महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ठ असणाऱ्या उमेदवारांचा परीक्षा कालावधी टेट परीक्षांच्या कालावधीमध्ये नियोजित असेल तर अशा उमेदवारांनी आपली माहिती परीक्षा परिषदेने दिलेल्या लिंकद्वारे १४ मे पर्यंत सादर करावी.
त्यातून या संबंधित उमेदवारांचे टेट परीक्षेच्या बॅचेसचे नियोजन केले जाणार आहे. उमेदवारांनी मुदतीत माहिती सादर न केल्यास उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.





