Pune : परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

पुणे : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) मधील विद्यार्थ्यांसाठी परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १७ मे होती. ही मुदत वाढवून ६ जून २०२५ पर्यंत करण्यात आली आहे.
क्यूएस रँकिंग २०० मधील परदेशी संस्थांमध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका तसेच पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. याची माहिती, अर्जाचा नमुना, शासन निर्णय आदी माहिती इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांनी अर्ज या संकेतस्थळावरुन डाउनलोड करून, परिपूर्ण अर्ज ६ जून २०२५ रोजी सायंकाळी ०६.१५ वाजेपर्यंत समक्ष किंवा पोस्टाने इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, आकार प्रिमायसेस, दुसरा मजला, एम. एच. बी. कॉलनी, म्हाडा कमर्शिअल कॉम्प्लेक्स समतानगर, येरवडा, पुणे येथे दोन प्रतीत सादर करावा.




