पुणे : हडपसरमधील शेवाळवाडी भागात भरदिवसा सराफी पेढीवर दरोडा टाकण्यात आल्याची घटना रविवारी घडली. चोरट्यांनी शस्त्राच्या धाकाने ५२ लाखांचे दागिने लुटून नेले. याबाबत एका सराफ व्यावसियाक महेद्रसिंह सोलंकी (वय ३७) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पाच चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर साेलंकी यांची महावीर ज्वेलर्स सराफी पेढी आहे. रविवारी दुपारी साेलंकी सराफी पेढीत एकटेच होते. त्या वेळी खरेदीच्या बहाण्याने चौघे जण सराफी पेढीत शिरले. त्यांच्याबरोबर असलेला एक जण सराफी पेढीबाहेर थांबला होता. चोरट्यांनी साेलंकी यांना कोयत्याचा धाक दाखविला. आरडाओरडा केला तर, जीवे मारू अशी धमकी चोरट्यांनी त्यांना दिली. चोरट्यांनी सराफी पेढीतील दागिने पिशवीत भरले. दाागिने लुटून चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच मांजरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सराफी पेढीतील चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे.