Pune: अति महत्त्वाच्या रस्त्याचे काम वेगात; लोहगाव विमानतळाला जोडणारा अडीच किलोमीटरचा रस्ता

पुणे – लोहगाव विमानतळाला जोडणाऱ्या विमानतळ ते वैकफील्ड चौक या सुमारे अडीच किलोमीटर अति महत्त्वाच्या व्हिव्हिआयपी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने काम सुरू केले आहे. या रस्त्यासाठी संरक्षण विभागाने दोन्ही बाजूची एकत्रित सुमारे सहा मीटर जागा दिलेली आहे, विमानतळावर येणाऱ्या अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी हा रस्ता तयार करण्यात येत आहे. विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने या रस्त्याच्या कामाला वेग आला आहे.
पुण- नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते त्यातच लोहगाव विमानतळ परिसरातही वाहतूक कोंडी होत असल्याने विमानतळावर येणाऱ्या तसेच जाणारी वाहने तासन् तास अडकून पडतात अशावेळी अति महत्त्वाच्या (व्हिव्हीआयपी) व्यक्तींसाठी या ठिकाणी स्वतंत्र रस्ता तयार करण्याचे प्रस्तावित होते त्यानुसार या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या रस्त्यासह अन्य रस्त्यांच्या कामेही महापालिकेकडून प्रस्तातिव आहेत. परंतु, निधी अभावी ही कामे रेंगााळली आहेत, या पार्श्वभूमीवर व्हिव्हीआयपी रस्त्याचे काम मात्र वेगाने सुरू आहे.
दोन्ही बाजूला स्वच्छता सुरू
विमानतळ ते वैकफील्ड चौक व्हिव्हिआयपी रस्त्यालगत दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात गवत तसेच राडारोड पडला आहे. या रस्त्याच्या कामासाठी महापालिकेला मान्यता मिळाल्यानंतर कच्चा रस्ता समपातळीत आणण्यासाठी सपाटीकरण करण्यात येत असून गवत काढणे तसेच राडारोडा उचलणे अशी कामे सुरू करण्यात आली आहेत.
सध्या, हा व्हिव्हीआयपी रस्ता सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला असलेली तीन मीटर मोकळी जागा मिळाल्यास हा रस्ता आणखी सहा मीटर मोठा होऊ शकतो. याकरिता प्रशासकीय पातळीवर काम सुरू आहे.
” संरक्षण विभागाने व्हिव्हिआयपी रस्त्यालगतची जागा महापालिकेला द्यावी, याकरिता पाठपुरावा करण्यात आला, त्याानंतर मंजुरी मिळाल्याने पालिकेने रस्त्याचे काम सुरू केले. रस्ता समपातळीत आणण्याचे काम सुरू असून त्यानंतर वाहतूक सुरळीत होईल. या ठिकाणी डांबरीकरणही लवकरात लवकर केले जाईल.” – अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग, पुणे महापालिका





