Pune Crime – शहरातील राजाराम पूल परिसरात भरदिवसा रस्त्यात एकाने तरुणीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी संबंधिताला पकडून चांगलाच चोप देऊन धडा शिकवला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, नसरापुरात चिमुरीडवर अत्याचार व खून प्रकरण, पर्वती पायथा परिसरातील चिमुरडीच्या आजोबानेच केलेला विनयभंगाच्या घटना ताज्या असतानाच, पुन्हा एकदा तरुणीची छेड काढल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी बुधवारी (दि. ६) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राजाराम पूल परिसरातून जात होती. त्यावेळी परिसरात मोठी वर्दळ असताना संबंधित आरोपीने तरुणीला त्रास दिला. आरोपी तिची छेड काढत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. हे पाहताच नागरिक संतप्त झाले. त्यांनी तत्काळ आरोपी तरुणाला ताब्यात घेत चोप देण्यास सुरुवात केली. काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणून, आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून, संबंधित तरुणीचा जबाव नोंदवला आहे.