प्रभात वृत्तसेवा पुणे – मध्य प्रदेशातील उमरटीमधील शस्त्र निर्मीती कारखाने उधवस्त केल्यानंतर शहरातील गुन्हेगारी टोळ्या आणि उमरटीचे दररोज नव नवे कनेक्शन समोर येत आहे. उमरटीतून सर्वाधिक गावठी कट्टे खरेदी आंदेकर टोळीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. या शस्त्रांचा वापर करण्याबरोबरच त्याची विक्रीही टोळीने केली आहे. यामुळे उमरटी शस्त्र तस्करी प्रकरणी आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल होणार आहे. उमरटीतून राज्यभर शस्त्रांचा पुरवठा होत होता. पुणे शहरातील जवळपास सर्वच गुन्हेगारी टोळ्यांकडे मेक इन उमरटीचे गावठी कट्टे होते. शहरात गेल्या काही वर्षात अचानक कट्टा संस्कृती वाढायला लागली. गुन्हेगारी टोळ्यांबरोबरच ठेकेदार, व्यावसायीक आदींकडेही गावठी कट्टे सापडत होते. मध्यंतर काही अल्पवयीन गुन्हेगारांकडेही गावठी कट्टे सापडले होते. दरम्यान मिरवण्यासाठी आणि दहशतीसाठी गावठी कट्टे वापरणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. जळगाव- धुळे मार्गे हे कट्टे सहज शहरात येत होते.उमरटीमधील कारवाईनंतर पोलीस त्यांचे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे कनेक्शन शोधत आहेत. यामध्ये आंदेकर टोळीचे मोठे कनेक्शन उमरटी गावाशी असल्याचे आढळले आहे. ही टोळी गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर उमरटीमधून गावठी कट्टे खरेदी करत आहे. तसेच टोळीतील काही सदस्य कट्टयांच्या विक्री व्यवसायातही सहभागी झाल्याचे दिसते. हे सर्व उजेडात आल्यावर शस्त्र तस्करी प्रकरणी पोलीस आंदेकर टोळीच्या पुन्हा एकदा मुसक्या आवळण्यास सज्ज झाले आहेत. सध्या आंदेकर टोळीचे सर्व सदस्य आयुष कोमकर आणि गणेश माने खून प्रकरणी कारागृहात आहेत. पोलिसांनी नुकतीच बंडू आंदेकर याच्या तिन्ही नातवांना एका गुन्हयात कारागृहातून वर्ग करुन घेत त्यांची नाना पेठेतून धिंड काढली होती. उमरटीतील कट्टे उत्कृष्ठ कोंढव्यातील खडी मशीन चौकात भर दिवसा रिक्षा चालक गणेश माने याचा खून करण्यात आला होता. वनराज आंदेकरच्या खूनाचा सूड उगविण्यासाठी बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर यांनी कारागृहातून ही सुपारी दिली होती. या खुनाच्या घटनेत हस्तगत केलेला गावठी कट्टा उमरटी गावातूनच आणण्यात आला होता. यापुर्वी शहरात येणारे गावठी कट्टे रामभरोसे होते. त्यातून गोळी सुटली तर सुटली नाही, तर ती हातातच फुटत असे. अनेकदा गोळीबार करताना कट्टा जाम होत असे. उमरटी गावातील कट्टे उकृष्ट दर्जाचे आहेत. यामुळे सर्व गुन्हेगारी टोळ्यांचा कल उमरटीचे कट्टे खरेदी करण्याकडे होता. पुर्वी कट्टयाबरोबर दोनच गोळ्या (बुलेट) दिल्या जात होत्या. नवीन बुलेट खरेदी करायच्या झाल्यावर पुन्हा एकदा कट्टा खरेदी करावा लागत होता. आता मात्र कट्टयाबरोबर हव्या तेवढ्या बुलेटस दिल्या जात आहेत. “पुणे शहरातील काही प्रमुख टोळ्या उमरटी गावातून शस्त्र खरेदी करत असल्याचे तपासात आढळले आहे. या टोळ्यांची खरेदी विक्रीची लिंक तपासली जात आहे.” – सोमय मुंडे (उपायुक्त, परिमंडळ चार)