प्रभात वृत्तसेवा पुणे – महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संगणक अभियंता जुबैर हंगरगेकर याला पुन्हा अटक करून शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने जुबैरला ३ जानेवारीपर्यंत ११ दिवसांची एटीएस कोठडी सुनावली आहे. तपास यंत्रणांचा दावा आहे की जुबैरकडून मिळालेल्या डिजिटल व गुप्तचर पुराव्यांमधून त्याचा थेट संबंध आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कशी विशेषतः अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि महाराष्ट्रातील पडघा गावाशी जोडला गेला आहे. कोंढवा येथील छापेमारीनंतर एटीएसने २७ ऑक्टोबर रोजी त्याला अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता. तपासात महत्वाचे धागे मिळाल्याने त्याला पुन्हा अटक करण्यात आले आहे.एटीएसच्या माहितीनुसार, जुबैर पुण्यातील एका आयटी कंपनीत कार्यरत होता. मात्र प्रत्यक्षात तो कट्टरपंथी विचारसरणीचा सक्रिय प्रचारक होता. तो ठाणे जिल्ह्यातील पडघा गावात वारंवार जात असे. तेथे त्याला युवकांना भडकवण्यासाठी, जिहाद व खलिफत याविषयी भाषणे देण्यासाठी आणि भारतविरोधी हिंसाचारासाठी मानसिक तयारी करून देण्यासाठी खास पाठवले जात होते. डिसेंबर २०२३ मध्ये एटीएसने पडघा येथे पहाटे तीन वाजता छापा टाकला असता, त्याची पूर्वकल्पना लागल्याने तो फरार झाला होता. सुमारे दोन वर्षांनंतर त्याच्या अटकेमुळे संपूर्ण नेटवर्कची पाळेमुळे उघड होऊ लागली आहेत. एटीएसने न्यायालयात सांगितले की, जुबैरच्या मोबाइल फोन, टेलिग्राम अकाउंट, गूगल टेकआउट डेटा आणि यूट्यूब सर्च हिस्ट्रीच्या तपासणीत मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह मजकूर आढळून आला आहे. त्याच्या टेलिग्राम ग्रुपशी १०२ आयडी जोडलेल्या होत्या. त्यापैकी ८ आयडींची ओळख इन्स्टाग्रामद्वारे पटली असून ४ आयडींचे आयपी अॅड्रेस ट्रेस करण्यात आले. त्यातील ३ आयपी अॅड्रेस अफगाणिस्तानातील तर १ हाँगकाँगमधील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपास यंत्रणांना संशय आहे की हे अकाउंट्स भारतातील जिहादी सेलला निर्देश देणे, निधी आणि लॉजिस्टिक सपोर्ट पुरवण्याशी संबंधित असू शकतात. या विदेशी आयपी अॅड्रेसचा आयएसआयएस किंवा संबंधित संघटनांशी संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे. पडघा झाले दहशतवादी केंद्र ठाणे जिल्ह्यातील पडघा गाव, जे पूर्वी सामान्य ग्रामीण भाग म्हणून ओळखले जात होते, आता तपास यंत्रणांच्या दृष्टीने एक मोठे दहशतवादी केंद्र बनले आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, येथील काही कट्टरपंथी गटांनी या परिसराला अल-शाम किंवा ग्रेटर सीरिया असे नाव दिले होते. जंगल, टेकड्या आणि निर्जन शेतांनी वेढलेले हे गाव दहशतवाद्यांसाठी लपण्यास सोयीचे ठिकाण ठरले आहे. त्यामुळेच अनेक दहशतवादी कारवायांचे आरोपी येथे ये-जा करत असल्याचे समोर आले आहे. मोठ्या नेटवर्कचा भाग एटीएसच्या मते, जुबैरच्या संपर्कात असलेल्या इतर संशयितांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांतूनही बॉम्ब बनवण्याच्या पद्धती, जिहादी व्हिडीओ आणि संभाव्य लक्ष्यांची माहिती मिळाली आहे. यावरून जुबैर हा एका मोठ्या, संघटित आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा भाग असल्याचे स्पष्ट होते. हाँगकाँगशी संबंधित आयपी अॅड्रेसमुळे निधी किंवा क्रिप्टो व्यवहारांचा ॲंगलही तपासला जात आहे. मनी ट्रेल, डिजिटल वॉलेट्स आणि आंतरराष्ट्रीय कॉल रेकॉर्ड्सचा सखोल अभ्यास सुरू आहे.